जरांगेच्या आंदोलनाला तडे! जरांगेंच्या मागे शरद पवारांचा हात -संगीता वानखेडेंचा हल्लाबोल

संगीता वानखेडे यांनी टीकास्त्र सोडताना मनोज जरांगे मीडियालाही माहीत नव्हते. मनोज जरांगे हा भोळाभाबडा माणूस म्हणून मी त्यांच्यावर विश्वास ठेवला
जरांगेच्या आंदोलनाला तडे! जरांगेंच्या मागे शरद पवारांचा हात -संगीता वानखेडेंचा हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी/मुंबई : राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण जाहीर करूनही आरक्षणयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत नव्याने आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता आंदोलनात फूट पडण्याची चिन्हे दिसत आहेत. अजय बारसकर महाराज यांनी बुधवारी जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्यानंतर आता महिला आंदोलक संगीता वानखेडे यांनी गंभीर आरोप केले आहेत. या आंदोलनामागे शरद पवार यांचा हात असून, दंगल घडली की घडवली, याचा सरकारने शोध लावावा, असा आरोप केला.

संगीता वानखेडे या मनोज जरांगे यांच्यासोबत आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. मात्र, आता त्यांनी या आंदोलनातून फारकत घेतली आहे. त्याआधी नव्याने आंदोलन करण्याची घोषणा जरांगे यांनी केली. तत्पूर्वी, त्यांचेच सहकारी अजय बारसकर महाराज यांनी ऐनवेळी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन जरांगे यांच्यावर घणाघात केला. जरांगे-पाटील हे खोटारडे, हेकेखोर, हट्टी आहेत. त्यांना कायद्याचे अजिबात ज्ञान नाही, असा आरोप केला होता. त्यावर जरांगे यांनी माझ्याविरोधात लावलेला ट्रॅप असल्याचे म्हटले होते. त्यानंतर गुरुवारी आणखी एक आंदोलक संगीता वानखेडे यांनी जरांगे यांच्यावर आरोप केला.

संगीता वानखेडे यांनी टीकास्त्र सोडताना मनोज जरांगे मीडियालाही माहीत नव्हते. मनोज जरांगे हा भोळाभाबडा माणूस म्हणून मी त्यांच्यावर विश्वास ठेवला. जरांगे यांची बाजू घेऊन मी भुजबळ यांना ट्रोल केले होते. पण जरांगे-पाटील विश्वासघातकी आहेत. ते कोणालाही विश्वासात घेत नव्हते. फक्त एक फोन ज्यांचा येत होता, त्यांना विश्वासात घेत होते. तो फोन शरद पवार यांचाच होता. मराठ्यांना आरक्षण मिळत होते, म्हणून याकडे दुर्लक्ष केले. खरे तर शरद पवार जसे सांगतात, तसेच मनोज जरांगे करतात. त्यामुळे आरक्षणाचे मारेकरी शरद पवार आहेत, असा आरोप केला.

जरांगेंवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा -भुजबळ

जरांगे यांनी पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने राज्याचे मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले असून, जरांगेंचे आंदोलन म्हणजे मारुतीचे शेपूट असून, ते कधीच संपणार नाही. आता तर त्यांनी वृद्धांना उपोषणाला बसायला सांगितले आहे. हा निव्वळ मूर्खपणा आहे. त्यामुळे यात एखादी व्यक्ती दगावली तर याची जबाबदारी मनोज जरांगे यांच्यावर टाकून त्यांच्याविरोधात थेट मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे.

संगीता वानखेडे या आंदोलक

मराठा आरक्षण आंदोलनात संगीता वानखेडे सक्रिय सहभागी होत्या. त्या पुण्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या फेसबुक प्रोफाईलवर स्त्रीशक्ती संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अशी ओळख आहे. त्यांनी आता थेट जरांगे-पाटील यांच्यावर आरोप केल्याने जरांगे यांच्या आंदोलनात फूट पडत असल्याचे बोलले जात आहे. या आंदोलनाला आता राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in