जव्हारमध्ये ST सेवा विस्कळीत; नादुरुस्त बसमुळे प्रवाशांचे हाल, तातडीच्या उपाययोजनांची मागणी

जव्हार तालुक्यात राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बससेवेवर नादुरुस्त बसेसचा मोठा परिणाम होत असून अनेक फेऱ्या अनियमित झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
जव्हारमध्ये ST सेवा विस्कळीत; नादुरुस्त बसमुळे प्रवाशांचे हाल, तातडीच्या उपाययोजनांची मागणी
जव्हारमध्ये ST सेवा विस्कळीत; नादुरुस्त बसमुळे प्रवाशांचे हाल, तातडीच्या उपाययोजनांची मागणी
Published on

दीपक भिसे/जव्हार

जव्हार तालुक्यात राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बससेवेवर नादुरुस्त बसेसचा मोठा परिणाम होत असून अनेक फेऱ्या अनियमित झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

शासकीय कामे, वैद्यकीय उपचार, शिक्षण, बाजारपेठ तसेच नोकरीसाठी दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना तासनतास बसस्थानकावर प्रतीक्षा करावी लागत आहे. परिणामी त्यांच्या दैनंदिन कामांवर विपरीत परिणाम होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

जव्हार तालुक्यात ४८ ग्रामपंचायती आणि दोन ग्राममंडळांचा समावेश आहे. तालुक्यातील बहुतांश गावांतील नागरिकांना विविध कामांसाठी जव्हार शहरात ये-जा करावी लागते. विशेषतः पावसाळ्यात डोंगराळ भागातील रस्त्यांवर दुचाकीने प्रवास करणे धोकादायक ठरत असल्याने नागरिकांचा एसटी बससेवेवर मोठा विश्वास असतो. मात्र, जव्हार आगारातील अनेक बस नादुरुस्त असल्याने नियोजित फेऱ्या रद्द होत आहेत किंवा मोठ्या विलंबाने सुरू होत असल्याचे चित्र आहे.

अनेक वेळा बस उपलब्ध न झाल्याने खासगी वाहनांचा पर्याय स्वीकारावा लागतो. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एसटी ही केवळ प्रवासाचे साधन नसून दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे जव्हार आगाराला तातडीने नवीन बसेस उपलब्ध करून देणे तसेच सर्व फेऱ्या वेळापत्रकानुसार सुरू ठेवण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने त्वरित उपाययोजना कराव्यात.

ग्रामीण भागासाठी जीवनवाहिनी

पावसाळ्याच्या काळात एसटी सेवा ही ग्रामीण भागासाठी जीवनवाहिनी मानली जाते. त्यामुळे बससेवा सुरळीत राहणे अत्यंत आवश्यक असतानाही वारंवार फेऱ्या रद्द होणे किंवा उशिराने बस धावणे ही गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, रुग्णांना उपचारासाठी होणारा विलंब तसेच शासकीय कार्यालयांतील कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत.

मला अत्यावश्यक कामानिमित्त नाशिकला जायचे होते. त्यासाठी सकाळी १० वाजल्यापासून जव्हार बसस्थानकावर बसची वाट पाहत होतो. मात्र, दोन तास उलटूनही बस आली नाही. त्यामुळे माझी पुढील सर्व नियोजित कामे विस्कळीत झाली. जव्हार आगाराने बससेवा वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.

गणेश तरे, प्रवासी

पावसाळ्यात एसटी हा सर्वात सुरक्षित प्रवासाचा पर्याय आहे. महिलांना अर्धे तिकीट मिळत असल्याने आर्थिक बचतही होते. मात्र, जव्हार आगारातील बस दुरुस्तीसाठी गेल्यानंतर त्या परत येण्यास खूप विलंब होतो. त्यामुळे अनेक फेऱ्या रद्द होतात आणि प्रवाशांचा मोठा खोळंबा होतो.

वनिता निकम, प्रवासी

logo
marathi.freepressjournal.in