नगराध्यक्षपदाच्या रिंगणात जय पवार यांच्या नावाची चर्चा; बारामती आणि राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय

उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा ‘धक्कातंत्रा’चा वापर करणार का? हा प्रश्न सध्या बारामती आणि राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अजित पवार आपले पुत्र जय पवार यांचे नाव पुढे आणू शकतात, अशी जोरदार चर्चा सुरू असून ही संभाव्य हालचाल 'दादांची जय पवारांसाठी पॉवरफुल खेळी' म्हणून पाहिली जात आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा ‘धक्कातंत्रा’चा वापर करणार का? हा प्रश्न सध्या बारामती आणि राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अजित पवार आपले पुत्र जय पवार यांचे नाव पुढे आणू शकतात, अशी जोरदार चर्चा सुरू असून ही संभाव्य हालचाल 'दादांची जय पवारांसाठी पॉवरफुल खेळी' म्हणून पाहिली जात आहे.

तब्बल नऊ वर्षांनंतर होणाऱ्या बारामती नगरपरिषद निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवल्यानंतर आता ते स्थानिक स्तरावर संघटन मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. बारामती नगरपरिषद ही पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी ‘अ वर्ग’ नगरपरिषद असून यावेळी ४१ नगरसेवक निवडून येणार आहेत. नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव असल्याने राष्ट्रवादीत इच्छुकांची गर्दी झाली आहे. त्यामुळे अंतर्गत संघर्ष टाळण्यासाठी अजित पवार जय पवारांना मैदानात उतरवून सर्वांना एकत्र आणू शकतात, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. जय पवार यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यावेळीच “पार्थनंतर आता जय पवारांची एन्ट्री” अशी चर्चा रंगली होती.

या पार्श्वभूमीवर बारामती नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे राजकीय लक्ष वेधले गेले आहे. आगामी काही दिवसांत अजित पवारांची ही खेळी प्रत्यक्षात उतरते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

माळेगाव पॅटर्नची पुनरावृत्ती?

अजित पवारांनी अलीकडेच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करून सर्वांना धक्का दिला होता. त्यांच्या या रणनीतीमुळे क्रॉस व्होटिंग टळले आणि निर्विवाद सत्ता मिळवण्यात ते यशस्वी ठरले. त्यामुळे आता बारामती नगराध्यक्षपदासाठीही त्याच पॅटर्नची पुनरावृत्ती होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in