
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. या चर्चा सुरू असतानाच सोमवारी रात्री जयंत पाटलांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. दोघांमध्ये २० ते २५ मिनिटे चर्चा झाल्याची माहिती मिळते.
दरम्यान, जयंत पाटील यांनी स्वतः कालच्या भेटीबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, काल संध्याकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी आमची भेट झाली. सांगली जिल्ह्यातील काही महसुली प्रश्नांवर आमच्यात चर्चा झाली. जवळपास १० ते १२ निवेदने मी त्यांना दिली. २५ मिनिटे आमची भेट झाली. बैठकीसाठी राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्र्यांचा स्टाफ आणि शिष्टमंडळातील चार ते पाच जण सोबत होते.
या भेटीवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवर म्हणाले की, तुम्हाला बातमी माहिती होते, तेव्हा समजायचे ही प्रवेशाची भेट नाही. नितीन गडकरी हे जयंत पाटलांच्या कार्यक्रमात गेले होते. त्यावेळी पाटील म्हणाले होते, तुम्ही राष्ट्रवादीत येणार अशा बातम्या येऊ नयेत म्हणजे झाले. याचे कारण उद्धव ठाकरेंनी जे राजकारण नासवले, त्यामुळे पुढचे शंभर वर्षे लोक अशीच चर्चा करणार आहेत. महाराष्ट्रासाठी अशा चर्चा करणे चांगल्या वातावरणाचे लक्षण नाही.
भेटीत विकासकामांबाबत चर्चा
‘जयंत पाटील हे माझी अधिकृत वेळ घेऊन भेटण्यासाठी आले होते. त्यामुळे आमची कोणतीही राजकीय भेट नव्हती. तसेच आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा देखील झाली नाही. फक्त विकासकामाच्याबाबतीत आमची चर्चा झाली. त्यांचे काही मुद्दे महत्वाचे होते, ते मी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच जयंत पाटील यांनीही माझ्याशी राजकीय चर्चा केली नाही आणि मी देखील त्यांच्या राजकीय भविष्याबाबत बोलण्याएवढा मोठा नाही, असे स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.