मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदच्चंद्र पवार) नेते जयंत पाटील यांनी रविवारी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची सातारा येथील कराड येथील निवासस्थानी भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी आरोग्याच्या समस्यांमुळे निवडणूक लढविण्यास नकार दिल्याने जयंत पाटील व पृथ्वीराज चव्हाण यांच्या बैठकीला महत्त्व दिले जात आहे.
चव्हाण यांनी १९९० च्या दशकात संसदेत साताऱ्याचे प्रतिनिधित्व केले होते, परंतु शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यावर १९९९ मध्ये त्यांना श्रीनिवास पाटील यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होतात. त्यानंतर राष्ट्रवादीने साताऱ्यातून उमेदवार उभे केले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार साताऱ्यातून पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. उदयनराजे यांच्या विरोधात मविआची ही मोठी खेळी असण्याची शक्यता आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते श्रीनिवास पाटील हे खासदार आहेत. पण त्यांनी प्रकृतीमुळे त्यांनी पुन्हा लढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या जागी कुणाला उमेदवारी द्यायची त्यावर खल चालू आहे. येथे भाजपकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली जाण्याची शख्यता असल्याने तितकाच मातब्बर उमेदवार त्यांच्यापुढे उतरविण्यासाठी महाविकास आघाडीने बाह्या सरसावल्या आहेत. त्या संबंधातच काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात आज सविस्तर चर्चा झाली, असे सूत्रांनी सांगितले.
पृथ्वीराज चव्हाण यांना येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्यास ते कोणत्या चिन्हावर निवडणूक लढतील त्यावर सूत्रांनी सांगितले की काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्यात सातारा व भिवंडी या मतदारसंघात अदलाबदली करता येऊ शकते. तसे झाल्यास सातारा येथील ही लढत लक्षणीय ठरू शकेल.