जयंत पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; महायुतीत जाण्याची शक्यता फेटाळली

सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांना अपात्र केल्याच्या पार्श्वभूमीवर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी मंगळवारी रात्री भेट घेतली, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी बुधवारी केला.
जयंत पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; महायुतीत जाण्याची शक्यता फेटाळली
जयंत पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; महायुतीत जाण्याची शक्यता फेटाळली
Published on

मुंबई : सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांना अपात्र केल्याच्या पार्श्वभूमीवर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी मंगळवारी रात्री भेट घेतली, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी  बुधवारी केला. आपण  महायुतीमध्ये जाणार नाही, असे स्पष्ट करतानाच मुख्यमंत्र्यांच्या भेटीत राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

जयंत पाटील यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे राष्ट्रवादी शरद पवार गट महायुतीसोबत जाणार, जयंत पाटील यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत बोलताना पाटील ही चर्चा फेटाळून लावली. आम्ही सगळे राष्ट्रवादी शरद पवार यांच्या मागे एकसंधपणे उभे  आहोत. त्यामुळे वारंवार अशाप्रकारच्या चर्चा समोर येत असल्याने  मला दुःख होत असल्याचे ते म्हणाले.

मी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हॉलमध्ये एकटाच बसून होतो. मुख्यमंत्री बराच वेळ अंतर्गत बैठकीत व्यग्र  होते. ते बाहेर आल्यावर माझी त्यांच्याशी १० ते १५ मिनिटे चर्चा झाली. ते आत कोणासोबत बैठक घेत होते, याची मला कल्पना नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे  प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अथवा  प्रफुल पटेल यांच्याशी माझी भेट झालेली नाही. त्यामुळे पक्षाच्या विलीनीकरणाची चर्चा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अजित पवार यांच्या निधनानंतर या प्रकारची चर्चा कोणासोबतही झालेली नाही. ही चर्चा पूर्णपणे थांबलेली आहे, असे पाटील यांनी सांगितले.

आपण पक्ष सोडणार नाही. तसेच खातेवाटपाचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो, तो अधिकारही प्रसारमाध्यमे हिरावून घेत आहेत. मी कसलाच विचार केलेला नाही, तुम्ही लोकांनीच फार विचार केला आहे. माणूस पक्षातून गेला तरच अशा चर्चांना अर्थ असतो, अशी मिश्किल टिप्पणीही जयंत  पाटील यांनी यावेळी  केली.

नगराध्यक्ष अपात्रतेचा विषय

 ईश्वरपूरच्या  नगराध्यक्षांना अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले आहे. हा निर्णय चुकीचा असून यात मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिकरीत्या लक्ष घालावे, यासाठी आपण  मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो.  यापूर्वी मी याच कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. पण ते दिल्ली दौऱ्यावर असल्याने भेट होऊ शकली नाही.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in