अखेर जयंत पाटलांचा राजीनामा; शशिकांत शिंदेंकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अखेर आठ वर्षांच्या कारकीर्दीनंतर राजीनामा दिला. त्यानंतर त्यांच्या जागी आमदार शशिकांत शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली.
अखेर जयंत पाटलांचा राजीनामा; शशिकांत शिंदेंकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा
photo : x (@shindespeaks)
Published on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अखेर आठ वर्षांच्या कारकीर्दीनंतर राजीनामा दिला. त्यानंतर त्यांच्या जागी आमदार शशिकांत शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मंगळवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत याबाबतची घोषणा करण्यात आली.

काही दिवसांपूर्वीच जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे संकेत दिले होते. जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्यावर त्यांनीच शशिकांत शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर शशिकांत शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांसोबत आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही त्यांनी शरद पवारांची साथ दिली. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांना मोठा अनुभव आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी ते एक आहेत.

“सध्याचे राजकारण बदलले असून सत्तेचे आणि पैशाचे आमीष दाखवून विरोधकांना सत्ताधारी पक्षात ओढले जाते. त्याविरोधात लढा देणार. महिन्याभरात राज्याचा दौरा करणार असून त्या माध्यमातून पक्ष संघटना मजबूत करणार. राजकारणामध्ये नवीन तरुणांना संधी देणार, वेगवेगळ्या घटकांना सोबत घेणार,” असेही शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

आर. आर. पाटील यांच्याप्रमाणे काम करणार - शिंदे

“पक्षामध्ये अनेक दिग्गज नेते असतानाही मला प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली. या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करणार. सर्वसामान्य नेत्याला संधी मिळाल्यावर कसे काम करता येते, हे आर. आर. पाटल यांनी दाखवून दिले. मीसुद्धा आर. आर. आबांप्रमाणे काम करणार. शासनाच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवणार, वेळ पडल्यास रस्त्यावर उतरणार. राष्ट्रवादीला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आणण्यासाठी दिवसरात्र कष्ट करणार,” असे निवडीनंतर शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

एकही दिवस सुट्टी न घेता काम केले - जयंत पाटील

“मला शरद पवारांनी अध्यक्षपदाची संधी दोनदा दिली. सात वर्षे काम करत असताना एकदाही सुट्टी घेतली नाही. आतापर्यंत काम करत असताना माझी कोणतीही संघटना निर्माण केली नाही किंवा वेगळा गट केला नाही. असले पाप कधी केले नाही. २,६३३ दिवस मी प्रदेशाध्यक्ष होतो. आता पदावरून बाजूला व्हायची हीच योग्य वेळ आहे. सगळे सहकारी गेले तरी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला. दोन खासदार असलेला भाजप मोठा होऊ शकतो, तर १० आमदार असलेला आपला पक्ष मोठा का होऊ शकत नाही?,” अशा शब्दांत जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

logo
marathi.freepressjournal.in