
मुंबई : जयंत पवार यांच्या 'अधांतर' नाटकाने स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. मात्र याच नाटकावर प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी निर्मिती केलेला "लालबाग परळ", हा सिनेमा चांगला बनवला नाही. चित्रपटाची व्यावसायिक गणिते घालून या मूळ नाटकाच्या संहितेत बदल केला गेल्यामुळे तो उत्तम चित्रपट बनू शकला नाही. यामुळे जयंत यांच्या नाट्य लेखनाशी मांजरेकर प्रामाणिक राहिले नाहीत. असे मत जयंत पवार स्मृती संमेलनाच्या अध्यक्ष अभिनेते अनिल गवस यांनी व्यक्त केले.
नाटककार, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कथाकार आणि नाट्य समीक्षक जयंत पवार स्मृती संमेलन समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथील सेवांगणच्या सभागृहात आयोजित करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी, विलास कोळपे यांनी घेतलेल्या मुलाखतीत अभिनेते गवस म्हणाले, महेश मांजरेकर हे फिल्मवाले आहेत, ते व्यवसाय बघतात. त्यानुसार ते मूळ लेखनात बदल करतात. त्यामुळे ‘अधांतर’ नाटक आणि त्यावरचा सिनेमा यात फरक राहिला.
संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक ॲॅड. देवदत्त परुळेकर यांनी पाब्लो नेरोदा यांची कविता वाचन करून संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी मंचावर संमेलनातील व्याख्याते समीक्षक डॉ दत्ता घोलप, समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय कांडर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर, संमेलनातील कवी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे आदी उपस्थित होते.
अनिल गवस म्हणाले, जयंत यांना लोकाश्रय खूप मिळाला, पण ते राजाश्रयापासून दूर राहिले. जयंत यांची दोन नाटके अप्रकाशित आहेत. ही नाटके रंगमंचावर येण्यासाठी लोकवर्गणी काढली जावी आणि त्याचे मोफत प्रयोग केले जावेत.
जयंत पवार स्मृती संमेलन हे त्यांच्या साहित्य विचारांचा जागर करणारे संमेलन आहे. अशी संमेलने संपूर्ण महाराष्ट्रात व्हायला हवीत, असे डॉ. दत्ता घोलप म्हणाले.
लेखक आणि अभिनेत्यानेही समाजाचा भाग व्हायला पाहिजे. जबाबदार नागरिक बनायला पाहिजे. नटाने आणि लेखकाने आपल्या भूमिकेशी ठाम असायला हवे. जयंत हे कायम आपल्या भूमिकेशी ठाम राहिले. त्यांनी दुसऱ्याच्या ऐकण्यालाही महत्त्व दिले. पण, स्वतःच्या लिहिण्याला अधिक महत्व दिले. - अनिल गवस, संमेलनाध्यक्ष