जिष्णु देव शर्मा आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

केंद्र सरकारने गुरुवारी रात्री उशिरा देशातील ९ राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती केली. त्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश असून आता जिष्णु देव वर्मा यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यालयांमधून या नियुक्त्यांसंदर्भातील पत्रक जारी करण्यात आले आहे.
जिष्णु देव शर्मा आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
जिष्णु देव शर्मा आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
Published on

नवी दिल्ली : केंद्र सरकारने गुरुवारी रात्री उशिरा देशातील ९ राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती केली. त्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश असून आता जिष्णु देव वर्मा यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यालयांमधून या नियुक्त्यांसंदर्भातील पत्रक जारी करण्यात आले आहे. राष्ट्रपतींनी पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. सी.व्ही. आनंद बोस यांचा राजीनामा स्वीकारला आहे. तमिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्रासह ९ राज्यांच्या राज्यपालांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून यामध्ये तेलंगण, नागालँड, बिहार, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, लडाख आणि दिल्लीचा समावेश आहे. जिष्णु देव वर्मा यांचा त्रिपुरा राजघराण्याशी संबंध आहे. राजकुमार रामेंद्र किशोर देव वर्मा आणि महाराजकुमारी कमल प्रवा देवी यांचे ते पुत्र आहेत. जिष्णु देव वर्मा हे सांस्कृतिक, क्रीडा व साहित्य क्षेत्रातील योगदानासाठीही ओळखले जातात. नियुक्तीनंतर जिष्णु देव वर्मा यांनी राष्ट्रपती मुर्मूंबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.

राजकीय प्रवास

जिष्णु देव वर्मा यांनी १९९० च्या सुरुवातीला भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्या काळात संपूर्ण त्रिपुरामध्ये कम्युनिस्ट पक्षाचा राजकीय प्रभाव होता. ते २०१८ ते २०२३ या काळात त्रिपुराचे दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी अर्थसंकल्प, ग्रामीण विकास, वीज यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा चारिलम मतदारसंघातून पराभव झाला.

सांस्कृतिक आणि सामाजिक योगदान

जिष्णु देव वर्मा हे साहित्य आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी ओळखले जातात. ते लेखक आणि कवी म्हणून उत्तर-पूर्व भारतात प्रसिद्ध आहेत. त्यांनी १९९०–१९९३ दरम्यान भारताच्या बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. त्यांचा सांस्कृतिक सहभाग 'इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँण्ड कल्चरल हेरिटेज'बरोबरच 'नॉर्दन इस्टर्न काऊन्सिल'च्या कल्चरल अॅडव्हायजर कमिटीमध्ये दिसून येतो.

हिमाचल प्रदेशचे राज्यपाल श्री शिव प्रताप शुक्ला यांची तेलंगणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती, नंद किशोर यादव यांची नागालँडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती, लेफ्ट. जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन यांची बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती, तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती, केरळचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची तामिळनाडूच्या राज्यपालपदी नियुक्ती, लडाखचे लेफ्ट. गव्हर्नर कविंदर गुप्ता यांची हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती, दिल्लीचे लेफ्ट. गव्हर्नर विनयकुमार सक्सेना यांची लडाखचे लेफ्ट. गव्हर्नर म्हणून नियुक्ती तर दिल्लीत तरनजित सिंग संधू यांची लेफ्ट. गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in