'रोहित पवार अजून लहान, ते काय बोलतात याकडे लक्ष देत नाही', आव्हाडांनी सुनावले

देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचे भान सर्वांनीच ठेवले पाहिजे, अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे!", असे रोहित पवार म्हणाले होते.
 'रोहित पवार अजून लहान, ते काय बोलतात याकडे लक्ष देत नाही', आव्हाडांनी सुनावले

"देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचे राजकारण करू नये, पण देवा-धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात, त्यांना ते लखलाभ. अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचे भान सर्वांनीच ठेवले पाहिजे, अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे!", असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाविषयी केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यावर रोहित पवार अजून लहान आहेत, त्यांना मी महत्त्व देत नाही, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली आहे.

शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना, "रोहित पवार यांच्याबाबत मी बोलणार नाही, रोहित पवार काय बोलतात, याकडे मी लक्ष देत नाही. ते लहान आहेत. त्यांची आमदारकीची पहिली टर्म आहे. अबुधाबीमध्ये जाऊन रोहित पवार यांना तिथून बसून बोलणं सोपं आहे", असे आव्हाड म्हणाले.

काय म्हणाले होते रोहित पवार?

आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांवर केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पोस्ट लिहित नाराजी व्यक्त केली होती. "आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणे, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणे, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणावर, या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची गरज आहे.", असे रोहित पवार यांनी आपल्या 'एक्स'पोस्टमध्ये म्हटले होते.

आव्हाडांनी व्यक्त केला खेद -

"मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. इतिहासाचे विकृतीकरण करणे माझ काम नाही. पण, मी काल जे बोललो ते ओघात बोलून गेलो. राम, प्रभू श्रीराम, ज्याला आम्ही महाराष्ट्रात पांडुरंग हरी म्हणतो. त्या रामाबद्दल बोलताना मी म्हणालो की, ते मांसाहारी होते. मला हा वाद वाढवायचा नाही. तरीही भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो", असे स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे.

काय आहे प्रकरण?

३ जानेवारी रोजी शिर्डी येथे पार पडलेल्या मेळाव्यात बोलताना आव्हाड यांनी राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र, आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि मांसाहारी अन्न खात आहोत. १४ वर्षे वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार, असा प्रश्न उपस्थित केला होता. या वादग्रस्त विधानामुळे आव्हाड यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली.

logo
marathi.freepressjournal.in