...त्यांनी नाव घ्यावे "एनसीपी - अलिबाबा आणि चाळीस चोर", शरद पवार गटाला नवे नाव मिळाल्यानंतर आव्हाडांचा अजित पवार गटावर निशाणा

"अखेर सत्य सामोरे आलेच ! निवडणूक आयोगानेही नाव देतानाही कळत- न कळत हे दाखवून दिले की, एनसीपी ही शरद पवार साहेबांचीच आहे. म्हणून आम्हाला..."
...त्यांनी नाव घ्यावे "एनसीपी - अलिबाबा आणि चाळीस चोर", शरद पवार गटाला नवे नाव मिळाल्यानंतर आव्हाडांचा अजित पवार गटावर निशाणा

केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याची मान्यता दिल्यानंतर शरद पवार गटाला आज दुपारी ३ वाजेपर्यंत तीन नवीन चिन्ह आणि नावांचा पर्याय देण्याचे निर्देश दिले होते. शरद पवार गटाकडूनही तीन नावांचे पर्याय आयोगाला सादर करण्यात आले होते. त्यापैकी 'नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी–शरदचंद्र पवार' म्हणजे 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' या नावावर आयोगाने शिक्कामोर्तब केले. यावरुन शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला आहे.

"अखेर सत्य सामोरे आलेच ! निवडणूक आयोगानेही नाव देतानाही कळत- न कळत हे दाखवून दिले की, एनसीपी ही शरद पवार साहेबांचीच आहे. म्हणून आम्हाला नाव मिळालं, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरद पवार" . हेच खरे जन्मदाते होते पक्षाचे. पण, काही पाकिटमारांनी घड्याळ चोरले. पण, त्यांच्या दुर्देवाने मनगट आमच्याकडेच राहिले. लढाईत नेहमी मनगटच कामी येत असतं. शरद पवार आमचे मनगट अन् त्यात असलेला जोर पुन्हा एकदा महाराष्ट्रात जादू करेल. आता त्यांनी नाव घ्यावे, "एनसीपी - अलिबाबा आणि चाळीस चोर", असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला. त्यांनी 'एक्स'वर याबाबतची पोस्ट केली आहे.

'या' तीन नावांचा दिला होता प्रस्ताव-

शरद पवार गटाकडून नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी–शरद पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी–शरदचंद्र पवार आणि नॅशॅलिस्ट काँग्रेस पार्टी–एस, असे तीन पर्याय आयोगाला सुचवण्यात आले होते. या तीन पर्यायांपैकी दुसरा पर्याय आयोगाने मंजूर केला. त्यामुळे शरद पवार गट 'नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी–शरदचंद्र पवार' म्हणजे 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' या नावाने ओळखला जाणार आहे.

चिन्हाबाबतचा निर्णयही लवकरच लागण्याची शक्यता-

शरद पवार गटाला मिळालेले नवीन नाव हे २८ फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच राज्यसभेच्या निवडणुका पार पडेपर्यंतच वैध असेल, असे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, शरद पवार गट 'वटवृक्ष' या नव्या चिन्हासाठी आग्रही असून त्याबाबतचा निर्णयही लवकरच लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in