जितेंद्र आव्हाडांविरोधात अजित पवार गटाचं खास प्लॅनिंग; 'हा' उमेदवार विधानसभा निवडणूक लढवणार?

मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघात घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवली जाणार आहे, असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून करण्यात आलं आहे.
जितेंद्र आव्हाडांविरोधात अजित पवार गटाचं खास प्लॅनिंग; 'हा' उमेदवार विधानसभा निवडणूक लढवणार?
Published on

लोकसभा निवडणूकीनंतर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणूकीवर आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्व पक्षांतील प्रमुख नेते राज्यभर दौरे करत असून विविध मतदारसंघातील आपल्या पक्षाच्या ताकदीची चाचपणी केली जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून त्यांना आव्हान दिलं जाऊ शकतात. जितेंद्र आव्हाडांविरोधात अजित पवार गटाकडून नजीब मुल्ला निवडणूकीच्या रिंगणात उतरु शकतात, अशी चर्चा राजकीय विश्वात सुरु आहे.

जितेंद्र आव्हाडांना अजित पवार गटाचं आव्हान?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर निवडणूक आयोगानं हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना देऊ केलं. पक्षफुटीनंतर अनेक आमदार अजित पवारांसोबत गेले. त्याचवेळी काही आमदार मात्र शरद पवारांसोबत कायम राहिले. यामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार गटाची एकनिष्ठ राहत पक्षाची भूमिका ठामपणे मांडण्याचं काम केलं. यादरम्यान त्यांनी अनेकदा थेट अजित पवार यांच्यावर टीका केली. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून त्यांना मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघात आव्हान दिलं जाऊ शकतं.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आज पत्रकार परिषद घेत मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर लढवली जाईन, असं सांगितलं. त्यामुळे एक प्रकारे जितेंद्र आव्हाड यांना अजित पवार गटाने थेट आव्हान दिल्याची चर्चा रंगली आहे.

घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवली जाणार: नजीब मुल्ला

नजीब मुल्ला म्हणाले की, “गेल्या पंधरा वर्षांपासून मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघात घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली जात आहे. घड्याळ चिन्हावरच येथे उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे आता विधासभा निवडणुकीत मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघात घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवली जाणार आहे. पक्ष जो उमेदवार देईल, त्याला आम्ही निवडून आणणार आहोत.”

ते पुढं म्हणाले की, ‘मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील विकासाच्या बाबतीत आजपर्यंत जे खोटे बोलत आले आहेत, त्याबाबत सत्य परिस्थिती सर्वासमोर आणणार आहोत. उमेदवाराची घोषणा कधीही होऊ द्या. मात्र, कामाची सुरुवात झाली आहे."

logo
marathi.freepressjournal.in