आमदार जितेंद्र आव्हाड यांना दिलासा; प्रभू रामचंद्रांबद्दल वादग्रस्त विधानाप्रकरणी सर्व गुन्हे शिर्डी पोलीस ठाण्यात वर्ग

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथे ३ आणि ४ जानेवारी रोजी पक्षाच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना सरदार वल्लभभाई पटेल, अटलबिहारी वाजपेयी या राष्ट्रीय नेत्यांची उदाहरणे देतानाच प्रभू रामचंद्रांनी १४ वर्षे...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : प्रभू रामचंद्रांबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात राज्यातील विविध सात ठिकाणी नोंदवलेले गुन्हे शिर्डी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या वतीने अ‍ॅड. के. व्ही. सस्ते यांनी गुरुवारी उच्च न्यायालयात ही माहिती दिली. त्यामुळे न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांच्या खंडपीठाने याचिका निकाली काढली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथे ३ आणि ४ जानेवारी रोजी पक्षाच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना सरदार वल्लभभाई पटेल, अटलबिहारी वाजपेयी या राष्ट्रीय नेत्यांची उदाहरणे देतानाच प्रभू रामचंद्रांनी १४ वर्षे वनवास भोगला. त्यावेळी त्यांना शाकाहारी जेवण मिळाले नाही. अशाप्रकारे प्रभू रामचंद्रांबद्दल विधान केले. त्या विरोधात शिर्डीसह सात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून त्याचा स्वतंत्र तपास सुरू करण्यात आला. एकच गुन्हा विविध पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने ते एकत्रित करून ठाण्यातील वर्तकनगर किंवा नवघर पोलीस ठाण्यात वर्ग करावे, अशी विनंती करणारी याचिका दाखल केली.

या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती अरूण पेडणेकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी सरकारच्या वतीने अ‍ॅड. के व्ही. सस्ते यांनी हा प्रकार शिर्डी येथे घडला असल्याने सगळे गुन्हे शिर्डी येथे वर्ग करण्यात आल्याची माहिती न्यायालयाला दिली. याची दखल घेत खंडपीठाने याचिका निकाली काढली.

logo
marathi.freepressjournal.in