Nashik : पत्रकारांवर त्र्यंबकेश्वर येथे हल्ला

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर काही तरुणांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. या हल्ल्यात तीन पत्रकार जखमी झाले असून, त्यापैकी एकाला नाशिकमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पत्रकारांवर त्र्यंबकेश्वर येथे हल्ला
पत्रकारांवर त्र्यंबकेश्वर येथे हल्ला
Published on

नाशिक : सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर काही तरुणांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. या हल्ल्यात तीन पत्रकार जखमी झाले असून, त्यापैकी एकाला नाशिकमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्वामी समर्थ केंद्राजवळील कमान परिसरात गाड्यांच्या प्रवेशासाठी पावत्या देणाऱ्या काही व्यक्तींनी पत्रकारांवर अचानक हल्ला केला.

वार्तांकनासाठी पोहोचलेल्या पत्रकारांमध्ये योगेश खरे, अभिजीत सोनवणे आणि किरण ताजणे यांना बेदम मारहाण करण्यात आली. प्राथमिक उपचारासाठी तिघांनाही त्र्यंबकेश्वरच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले गेले. त्यानंतर गंभीर जखमी असलेल्या एका पत्रकाराला नाशिकच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.

या घटनेचा सर्व स्तरांतून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर त्र्यंबकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

मंत्री भुजबळ यांच्याकडून विचारणा

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या घटनेचा निषेध नोंदवत नाशिक येथील रुग्णालयात जाऊन जखमी पत्रकाराची विचारपूस केली. दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना पोलिसांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

सर्व स्तरांतून निषेध

शहापूर : त्र्यंबकेश्वर येथे कुंभ मेळ्याच्या संदर्भातील साधु-महंतांच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर टोल वसुली करणाऱ्या काही व्यक्तींनी केलेल्या हल्ल्याचा जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र (जेयुएम) ने तीव्र निषेध केला आहे. हल्लेखोरांना त्वरित अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी जेयूएमचे महाराष्ट्र अध्यक्ष नारायण पांचाळ आणि महाराष्ट्र संघटन सचिव राजेंद्र साळसकर यांनी केली आहे. जेयूएमने जिल्हाधिकारी कारवाईचे आश्वासन देत असले तरी यापूर्वीची कारवाई अपुरी ठरल्याचे निदर्शनास आणले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे तातडीने हस्तक्षेप करून हल्लेखोरांना अटक करावी आणि पत्रकारांना संरक्षण मिळावे, अशी मागणी केली आहे. जेयुएमचे अध्यक्ष नारायण पांचाळ यांनी स्पष्ट केले की, अन्यथा पत्रकारांना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल, आणि अशाप्रकारच्या घटनांना कधीही सवलत दिली जाणार नाही.

logo
marathi.freepressjournal.in