जुलैच्या पावसाने खरीपाला दिला वेग; राज्यात ६७ टक्के पेरण्या पूर्ण

जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने चिंतेत असलेल्या राज्यातील बळीराजासाठी जुलै महिन्याची सुरुवात दिलासादायक ठरली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जूनमधील पावसाची तूट काही प्रमाणात भरून निघाली असून, राज्यातील खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना चांगलाच वेग आला आहे.
जुलैच्या पावसाने खरीपाला दिला वेग; राज्यात ६७ टक्के पेरण्या पूर्ण
जुलैच्या पावसाने खरीपाला दिला वेग; राज्यात ६७ टक्के पेरण्या पूर्ण
Published on

पुणे : जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने चिंतेत असलेल्या राज्यातील बळीराजासाठी जुलै महिन्याची सुरुवात दिलासादायक ठरली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जूनमधील पावसाची तूट काही प्रमाणात भरून निघाली असून, राज्यातील खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना चांगलाच वेग आला आहे.

कृषी विभागाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत सरासरी खरीप क्षेत्राच्या ६७ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. राज्याचे एकूण सरासरी खरीप क्षेत्र १ कोटी ४४ लाख ३६ हजार ५४ हेक्टर असून, त्यापैकी ९६ लाख २० हजार ६७१ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र, गतवर्षी याच कालावधीत ८४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे यंदाचा हंगाम तुलनेने काहीसा संथ गतीने पुढे जात असल्याचे दिसून येत आहे.

यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांचा कल प्रामुख्याने सोयाबीन, कापूस आणि मका या पिकांकडे असल्याचे दिसून येत आहे. सोयाबीनच्या सरासरी क्षेत्रापैकी ६६ टक्के, तर कापसाच्या ७१ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे, मक्याला यंदा सर्वाधिक पसंती मिळाली असून, सरासरी ९.३३ लाख हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल ८.९० लाख हेक्टर, म्हणजेच ९५ टक्के क्षेत्रावर मक्याची पेरणी पूर्ण झाली आहे.

यंदाचा खरीप हंगाम समाधानकारक

जून महिन्यात राज्यात ४८ टक्के पावसाची तूट असल्याने पेरणीबाबत सुरुवातीला साशंकता निर्माण झाली होती. जुलै महिन्यात पावसाने राज्यभर दमदार हजेरी लावल्याने आता पेरण्यांचा वेग वाढला आहे. आगामी काळातही पावसाची साथ कायम राहिल्यास यंदाचा खरीप हंगाम समाधानकारक ठरेल, असा विश्वास कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in