वाद मिटला असे वाटत असतानाच पुन्हा एकदा रवी राणा - बच्चू कडू पुन्हा भिडले

पहिली वेळ होती म्हणून माफ केले. पुढच्या वेळी प्रहारचा वार काय असेल ते दाखवेन’, असा इशारा रवी राणा यांना दिला
वाद मिटला असे वाटत असतानाच पुन्हा एकदा रवी राणा - बच्चू कडू पुन्हा भिडले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर आमदार रवी राणा व बच्चू कडू यांच्यातील वाद शमला असल्याचे वाटत असतानाच हे दोन्ही आमदार पुन्हा एकमेकाला भिडल्याने त्यांच्यातील वाद पुन्हा विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत.

पहिली वेळ होती म्हणून माफ केले - कडू

प्रहार संघटनेच्या मेळाव्यात बोलताना मंगळवारी बच्चू कडू यांनी, ‘पहिली वेळ होती म्हणून माफ केले. पुढच्या वेळी प्रहारचा वार काय असेल ते दाखवेन’, असा इशारा रवी राणा यांना दिला होता. त्यावरून पुन्हा एकदा वाद उफाळला आहे.

घरात घुसून मारण्याची हिंमत ठेवतो - राणा

‘जर ते दम देऊन बोलत असतील, तर घरात घुसून मारण्याची हिंमत ठेवतो. त्यांना जशास तसे उत्तर देईन. ते ज्या स्तरावर म्हणतील, त्या स्तरावर उत्तर देईन’, असा इशारा आमदार रवी राणा यांनी बुधवारी बच्चू कडू यांना दिला.

‘बच्चू कडू आणि माझा वाद मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मिटवला. मी स्वःतही काही पावले माघार घेत तो वाद मिटवला. मात्र, कुणी मला जर दम देत असेल, तर मी गप्प बसणार नाही. रवी राणाने उद्धव ठाकरेंचा दम खाल्ला नाही. बच्चू कडू तर छोटा विषय आहे’, हे सांगायलाही राणा विसरले नाहीत.

राणा पुढे म्हणाले, प्रेमाच्या भाषेवर रवी राणा एक वेळा नव्हे दहा वेळा झुकेल. परंतु कुणी दम देत असतील तर मी घरात घुसून मारायला कमी करणार नाही. मंत्री बनने न बनने हा माझा अधिकार नाही. माझे नेते शिंदे, फडणवीस आहेत. त्यांचा आदर करून मी दोन पावले मागे आलो आणि दिलगिरी व्यक्त केली. कुणाचेही मन दुखवू नये म्हणून मी विषय संपवला.

कसे निवडून येतात ते बघतो!

‘मी रवी राणांना माफ करणार नाही, असे ते म्हणत असतील तर माफच काय मी त्यांना सांगतो की, तुझ्यात जेवढी हिंमत असेल ती लावा, ते कसे निवडून येतात ते बघतो. वेळच सांगेल की, बच्चू कडू पुन्हा आमदार होतो की, नाही ते’, असे आव्हान राणा यांनी बच्चू कडूंना दिले.

ठाकरेंना धूळ खावी लागली

‘उद्धव ठाकरेही आखडून राहत होते. त्यांना शेवटी मातीत धूळ खावी लागली. जे लोक आखडतात, मुख्यमंत्र्यांचा व उपमुख्यमंत्र्याचाही सन्मान करीत नाही, त्यांना धूळ खावी लागेल’, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला.

बच्चू कडूंना ५०० कोटींची गिफ्ट

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर रवी राणा आणि बच्चू कडू यांनी एक पाऊल मागे घेतले होते. त्यामुळे शिंदे-फडणवीसांनी कडूंना ५०० कोटींचे रिटर्न गिफ्ट दिले आहे. अमरावती जिल्ह्यातील सपन मध्यम प्रकल्पाला ४९५.२९ कोटींची सुधारीत मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर ६,१३४ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. हा प्रकल्प बच्चू कडूंच्या अचलपूर मतदारसंघातील आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in