न्यायमूर्ती रमेश धनुका यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती

राजभवनात एका छोटेखानी शपथविधी सोहळ्याचे आयोजन करुन राज्यपाल रमेश बैस यांनी न्यायमूर्ती धानुका यांना पदाची शपथ दिली.
न्यायमूर्ती रमेश धनुका यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्तीमुंबई उच्च न्यायालयाचे न्यायधीश रमेश देवकीनंदर धानुका यांची आज (28 मे) मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशपदी नियुक्ती करण्यात आली. आज त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राजभवनात एका छोटेखानी शपथविधी सोहळ्याचे आयोजन करुन राज्यपाल रमेश बैस यांनी न्यायमूर्ती धानुका यांना पदाची शपथ दिली.

केवळ तीन दिवसांचा कार्यकाळ

न्यायमूर्ती धानुका यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे न्यायमूर्ती धानुका यांचा कार्यकाळ हा फक्त तीन दिवसांचा असणार आहे. कारण ते येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. यासोबतच ते मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशपदी सर्वात कमी वेळ असलेले न्यायमूर्ती ठरणार आहेत. सर्वोच्च न्यालयातील न्यायमूर्तींचे निवृत्तीचे वय हे 65 वर्षे तर उच्च न्यायालयातील न्यामूर्तींचे निवृत्ती वय हे 62 वर्षे आहे. या नियमानुसार धानुका यांच्या कार्यकाळ फक्त तीन दिवसांचा ठरणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने 19 एप्रिल रोजी न्यायमूर्ती धानुका यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधिशपदी बढतीची शिफारस केली होती. माजी सरन्यायाधीश दीपंकर दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयात 11 डिसेंबर रोजी नियुक्ती झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात तब्बल पाच महिन्याहुन अधिक काळ मुख्य न्यायमूर्ती नव्हते. तत्कालीन ज्येष्ठ न्यायमूर्ती एसव्ही गंगापूरवाला यांची हंगामी मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 26 मे रोजी केंद्र सरकारकडून न्यायमूर्ती रमेश धानुका यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी तर न्यामुर्ती गंगापूरवाला यांची मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करणाऱ्या दोन स्वतंत्र अधिसूचना जारी करण्यात आल्या होत्या.

न्यायमूर्ती धानुका यांच्या शपथविधी सोहळ्याला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, राज्य मानवधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. कमल किशोर तातेड, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश, राज्याचे महाधिकावक्ता बिरेंद्र सराफ, माजी महाधिवक्ता आशुतोश कुंभकोणी, पोलीस महासंचालक रजनीश सेठ तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

logo
marathi.freepressjournal.in