बीडमधून ज्योती मेटे यांचे पंकजा मुंडेंना आव्हान

बीड जिल्हा मराठा आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरला आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले, तेव्हा बीडमध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली होती. त्या आंदोलनाची जिल्ह्यात धग कायम आहे.
बीडमधून ज्योती मेटे यांचे पंकजा मुंडेंना आव्हान

विशेष प्रतिनिधी/मुंबई

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी आपल्या शासकीय नोकरीचा राजीनामा दिला असून, त्यांनी आता थेट बीडमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. याअगोदर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षातून निवडणूक लढवतील, असे बोलले जात होते. परंतु त्यांनी आता निवडणूक लढण्याची घोषणा करताना कोणाकडून लढणार, हे जाहीर केलेले नाही. मात्र, कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची की अपक्ष निवडणूक लढवायची, हे दोन दिवसांत जाहीर करू, असेही मेटे यांनी म्हटले आहे. त्यामुळे मेटे विरुद्ध मुंडे अशी लढत बीडमध्ये रंगण्याची चिन्हे आहेत. मराठा उमेदवार म्हणून त्या अपक्षही लढू शकतात, असेही बोलले जात आहे. शरद पवार यांनी बीडमध्ये मोठा डाव खेळण्याची योजना आखली होती.

मराठा आंदोलनाच्या झळा

बीड जिल्हा मराठा आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरला आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले, तेव्हा बीडमध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली होती. त्या आंदोलनाची जिल्ह्यात धग कायम आहे. त्यामुळे मराठा मतदार पंकजा मुंडे यांना धक्का देऊ शकतात, असे बोलले जात असतानाच ज्योती मेटे मैदानात उतरल्यास जातीय समीकरणानुसार मराठा-वंजारी असेच मत विभाजन होण्याची शक्यता आहे. याचा फटका नेमका कुणाला बसू शकतो, हे उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाल्यावरच कळणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in