Jalgoan : विद्यार्थ्यांच्या मनात पेटणार ‘ज्योती’; २८ जिल्ह्यांतील १ हजार ८०० शाळांमध्ये लघुपट दाखवणार

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या २००व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून अजिंठा फिल्म सोसायटीच्या वतीने महाराष्ट्रात एक महत्त्वपूर्ण आणि व्यापक उपक्रम राबविण्यात येणार आहे.
Jalgoan : विद्यार्थ्यांच्या मनात पेटणार ‘ज्योती’; २८ जिल्ह्यांतील १ हजार ८०० शाळांमध्ये लघुपट दाखवणार
Jalgoan : विद्यार्थ्यांच्या मनात पेटणार ‘ज्योती’; २८ जिल्ह्यांतील १ हजार ८०० शाळांमध्ये लघुपट दाखवणार
Published on

जळगाव : क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या २००व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून अजिंठा फिल्म सोसायटीच्या वतीने महाराष्ट्रात एक महत्त्वपूर्ण आणि व्यापक उपक्रम राबविण्यात येणार आहे. येत्या २२ सप्टेंबर रोजी राज्यातील सुमारे २८ जिल्ह्यांतील १ हजार ८०० शाळांमध्ये तब्बल १० लाख विद्यार्थी एकाच दिवशी आणि एकाच वेळी ‘ज्योती’ हा लघुपट पाहणार आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी एकाच वेळी चित्रपट पाहण्याचा हा उपक्रम भारतीय चित्रपटसृष्टी आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी विशेष ठरणार आहे.

‘चित्रपटसृष्टी आणि भारतीय दृष्टी’ या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून अजिंठा फिल्म सोसायटी गेल्या १४ वर्षांपासून महाराष्ट्रात चित्रपटविषयक जागृती आणि नवोदितांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम करीत आहे. तरुणांना प्रत्यक्ष चित्रपट निर्मितीचा अनुभव मिळावा यासाठी फेलोशिप तसेच ‘टुरिंग टॉकीज’च्या माध्यमातून चित्रपट तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे कामही संस्थेने हाती घेतले आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये दर्जेदार चित्रपटांची आवड निर्माण करण्यासाठी यंदापासून ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सवाची सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, २२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या उपक्रमातून सुमारे १० लाख विद्यार्थ्यांपर्यंत फुले दाम्पत्याचा सामाजिक आणि शैक्षणिक विचार पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

फुले दाम्पत्याच्या विचारांचा जागर

विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, मूल्यशिक्षण आणि शिक्षणाचे महत्त्व रुजविणे, तसेच महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची ज्योत नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, लेखक आणि प्रा. योगेश सोमण यांच्या निर्मितीतील ‘ज्योती’ हा लघुपट महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा, संघर्षाचा तसेच स्त्रीशिक्षणासाठी त्यांनी केलेल्या ऐतिहासिक कार्याचा वेध घेतो. त्यांच्या कार्याची ओळख करून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in