

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर येथे राज्यातूनच नव्हे, तर देशातून मोठ्या संख्येने भाविक घेत असतात. या परिसराचे पर्यावरणीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्व आहे. या मंदिर परिसराचा विकास हा पर्यावरणीय दृष्टिकोनातून करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अमरावती शहरालगत हनुमान गढी परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे आयोजित शिखर समितीच्या बैठकीत सुधारित विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्योतिबा मंदिर डोंगर परिसराचा विकास करताना मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात यावी. आधी लागवड केलेल्या वृक्षांचे जिवंत राहण्याचे प्रमाण वाढविण्यात यावे. डोंगर परिसरावर घनकचरा व्यवस्थापन प्रभावीपणे करण्यात यावे. मंदिर परिसरात अनेक भाविक अन्नदान करीत असतात या अन्नदानाकरिता अन्न छत्रालय विकसित करण्यात यावे. येथे जास्तीत जास्त भाविक सामावून घेण्याची क्षमता असावी. दरम्यान, हनुमान गढी परिसराचा विकास करताना पर्यटकांसाठी सुविधा कामांना प्राधान्य द्यावे. या विकास आराखड्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. सर्व कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करावी. हनुमान गढी स्थळाच्या विकासानंतर हे ठिकाण अमरावती शहरालगत पर्यटकांसाठी पर्यटन केंद्राची पर्वणी ठरणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
हनुमान गढी परिसर पर्यटन विकासासाठी १२१ कोटींच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर व परिसर विकासाचा एकूण आराखडा २५० कोटी रुपयांचा आहे. त्यापैकी ८० कोटी रुपयांची कामे सुरू झालेली आहेत. श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर व परिसराचा सुधारित १७० कोटींच्या विकासकामांना मान्यता देण्यात आली.