कोरियन पर्यटक पडले ‘कास’च्या प्रेमात; हेरिटेजवाडीवर करण्यात आले जंगी स्वागत

जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या साताऱ्याजवळील कास पठारावरील यावर्षीचा फुलांचा हंगाम चांगलाच बहरला असून कासला देशविदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने भेट देऊ लागले आहेत. नुकतीच कासला दक्षिण कोरियन पर्यटकांनी भेट देऊन येथील फुलांच्या गालिच्यांचा आनंद घेतला.
कोरियन पर्यटक पडले ‘कास’च्या प्रेमात; हेरिटेजवाडीवर करण्यात आले जंगी स्वागत
Published on

कराड : जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या साताऱ्याजवळील कास पठारावरील यावर्षीचा फुलांचा हंगाम चांगलाच बहरला असून कासला देशविदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने भेट देऊ लागले आहेत. नुकतीच कासला दक्षिण कोरियन पर्यटकांनी भेट देऊन येथील फुलांच्या गालिच्यांचा आनंद घेतला. यावेळी कास पठाराजवळील हेरिटेजवाडी या ठिकाणी त्यांचा भारतीय संस्कृतीनुसार पारंपरिक पद्धतीने स्वागत व सन्मान करण्यात आले.

कास पठार विविधरंगी फुलांनी बहरले असल्याने सध्या ते खूप सुंदर दिसू लागले आहे. येथील नैसर्गिकसंपदा खूप सुंदर असल्याची भावना परदेशी पर्यटकांनी व्यक्त केली. .

कासवर सुरू झालेल्या बैलगाडीच्या सफरीचा आनंदही या पर्यटकांनी घेतला. प्रारंभी कास पठार जवळीलहेरिटेजवाडी या ठिकाणी संपत जाधव यांच्यावतीने पारंपरिक पद्धतीने हलगीच्या कडकडाटात आणि तुतारीच्या घोषात शाल, श्रीफळ देत पाहुण्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्रीयन पांढरी गांधी टोपी आणि हार घालून मिरवणूक काढण्यात आली. हलगीच्या तालावर या परदेशी पर्यटकांनीही ताल धरला.

पर्यटकांची मांदियाळी

कासवरील फुले आता चांगलीच फुलली असून पावसाने मात्र यात विघ्न आणले आहे. सातत्याने पाऊस पडत राहिल्यास फुलांच्या जीवनक्रमावर परिणाम होऊन हंगाम लवकर संपण्याचीही शक्यता आहे. तरीही आतापर्यंत हजारो पर्यटकांनी कासला भेट दिली असून हा आकडा वाढतच जाणार आहे. सलग सुट्ट्यांच्या कालावधीत कास पठार फुलांप्रमाणेच पर्यटकांनीही बहरून जात आहे. गेले दोन दिवस शनिवार, रविवारी सुट्टी असल्याने येथे पर्यटकांची मांदियाळी जमली होती.

logo
marathi.freepressjournal.in