काकस्पर्शालाही महागाईची झळ!

एकेकाळी पितृपक्ष पंधरवडा म्हटला की, गावात दररोज घरोघरी जेवणाच्या पंगती उठायच्या.
काकस्पर्शालाही महागाईची झळ!

अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन झाल्यानंतर सुरू होणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध घालण्याची प्राचीन परंपरा हिंदू धर्मात आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात थोडासा वेळ काढून ही प्रथा पाळण्यात येत असली तरी याला महागाईचा काकस्पर्श झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना पदरमोड करावी लागत आहे. जीएसटी करप्रणालीमुळे बाजारपेठेतील अनेक वस्तूंच्या वाढलेल्या किंमती, तसेच पेट्रोल-डिझेलचे सतत वाढणारे दर, डाळी, तांदळापासून किराणा सामानात झालेली वाढ, भाजीपाल्याच्या वाढलेल्या किंमतीमुळे पितरांच्या दिवशी सामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. इतकेच नव्हे तर भटजींच्या दक्षिणेतही कित्येक पटींनी वाढ झाली आहे.

एकेकाळी पितृपक्ष पंधरवडा म्हटला की, गावात दररोज घरोघरी जेवणाच्या पंगती उठायच्या. आजच्या धकाधकीच्या युगात केवळ घरच्या घरी पित्रे जेवू घालण्याची पद्धत वाढू लागल्याने पितृपक्षातील पंगती आता ग्रामीण असो वा शहरी भागात दुर्मिळ झाल्या आहेत. भाद्रपद पौर्णिमा ते अमावस्या हा पंधरवडा पितृपक्ष म्हणून पाळला जातो. या पंधरवड्यात हिंदूधर्मीय आपल्या पूर्वजांचे श्राद्ध घालत असतात. आजपासून काही वर्षे अगोदरपर्यंत पितृपक्ष म्हटला की ग्रामीण भागात घरोघरी पंगती उठविल्या जायच्या. घरातील गृहिणी दिवसभर स्वयंपाकात व्यस्त असायच्या. रात्री उशिरापर्यंत गल्लोगल्ली पंगतींची एकच लगबग चालायची. वरण-भात, कढी वडे, अळूच्या पानांच्या वड्या, खीर व तीन चार प्रकारच्या भाज्या अशा प्रकारचा पितरांचा खास मेनू असायचा आणि आजही आहे.

पितरांच्या शांतीसाठी ठेवण्यात येणाऱ्या वाडीत सर्व पदार्थ असतात. आणि यावेळी सर्व कुटुंब एकत्र येत असल्याने सर्व साहित्य आणि जेवणाचा खर्च काही हजारांत येत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या पित्राला महागाईचा काकस्पर्श झाल्याचे चित्र दिसत असले, तरी रीतीरिवाज परंपरेने पित्र घालण्यात येतात. त्यामुळे ‘अच्छे दिन’ची स्वप्ने दाखविणाऱ्या मोदी सरकारच्या काळात पितृपक्षालाही महागाईची झळ सोसावी लागत असल्याचे चित्र आहे.

केवळ श्राद्ध घालण्याची औपचारिकता

आजच्या व्यस्त युगात कुणाच्या घरी जेवायला जायलाही वेळ मिळेनासा झाला आहे. शिवाय विभक्त कुटुंब पद्धतीमुळे एवढा स्वयंपाक करायचा कुणी, हाही प्रश्न निर्माण झाल्याने आता घरच्या घरी पितृपक्ष ही पद्धत रुढ झाली आहे. पितृपक्षाला प्रारंभ होऊन दोन आठवडे होत आले तरी पूर्वी असलेला जेवणावळीचा गलबला कुठेच ऐकू येत नाही. आज पितृपक्ष म्हणजे केवळ श्राद्ध घालण्याची औपचारिकता बनून राहिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in