इचलकरंजी : राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त विकास महामंडळ (NUCPDC), मुंबई यांच्या वतीने इचलकरंजीतील कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेस ‘सर्वोत्कृष्ट बँके’चा मानाचा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार महामंडळाचे अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता, आमदार प्रवीण दरेकर आणि महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रम्हे यांच्या उपस्थितीत, उपाध्यक्षा वैशाली आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
सर्वसामान्य ग्राहकांच्या अडचणी सोडवणे, उद्योजकांना आर्थिक चालना देणे आणि सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण करणे या उद्देशाने बँकेने कार्य केले आहे. या प्रयत्नांचे फलित म्हणून सहकारी बँकिंग क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान बँकेच्या झळाळत्या यशाची पावती असल्याचे चेअरमन स्वप्निल आवाडे यांनी नमूद केले.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य बँक्स असोसिएशनचे संचालक, बँकेचे उपाध्यक्ष सीए संजयकुमार अनिगोळ, व्यवस्थापकीय संचालक चेअरमन सीए चंद्रकांत चौगुले, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरणावे उपस्थित होते.
अत्याधुनिक सेवा देत आमची बँक ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करत आहे. ग्राहक हा आमचा केंद्रबिंदू असून, त्यांच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध राहिलो आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणि सौहार्दपूर्ण सेवा यामुळे बँकेने लोकांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. - स्वप्निल आवाडे, बँकेचे चेअरमन