काळरात्र : इर्शाळवाडी दरडीखाली गडप १०० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली

१२ मृतदेह सापडले : २१ जण जखमी
काळरात्र : इर्शाळवाडी दरडीखाली गडप १०० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली

खालापूर (रायगड) : कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात भीषण दुर्घटना घडली. इर्शाळगडाच्या उदरात असणाऱ्या इर्शाळवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळली. या भीषण दुर्घटनेत सुमारे १७ घरे दरडीखाली गाडली गेली. त्यात १०० हून अधिक लोक अडकल्याचा अंदाज आहे, तर १०० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. गुरुवारी दुपारपर्यंत १६ मृतदेह हाती लागले होते, तर २१ जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले. हा सर्व परिसर दुर्गम भाग असल्यामुळे येथे मदतकार्यात अनेक अडथळे येत आहेत. इर्शाळवाडीपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्यामुळे यंत्रसामग्री नेणे अवघड झाले आहे. एनडीआरएफच्या पथकांनी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले पण मुसळधार पाऊस, वारे आणि धुके यामुळे मदतकार्य अर्ध्यावर थांबवावे लागले. शुक्रवारी पुन्हा मदत मोहीम सुरू केली जाणार आहे.

रायगडमध्ये मुंबई-पुणे महामार्गावरील चौक येथून पाच किलोमीटर अंतरावर दुर्गम भागात असणाऱ्या इर्शाळवाडी येथे बुधवारी रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान दरड कोसळल्याची घटना घडली. रात्री साडेअकरा वाजता जिल्हा प्रशासनास तर १२ वाजता राज्य नियंत्रण कक्षास ही माहिती मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघेही त्यानंतर ॲक्शनमध्ये आले. रात्रभर तिघांनीही परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यानच्या काळात मंत्री गिरीश महाजन यांना तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आले. पहाटे तीनच्या सुमारास महाजन तिथे पोहोचले. त्यानंतर सकाळी सहा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी आधी बेसकॅम्पवरून बचावकार्याची पाहणी केली. नंतर ते थेट दुर्गम अशी वाट तुडवत घटनास्थळी पोहोचले. अजित पवार यांनी मंत्रालयातील आपत्ती निवारण नियंत्रण कक्षातून परिस्थितीचा आढावा घेतला. उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मदत व पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील, उरणचे आमदार महेश बालदी हे देखील घटनास्थळी तातडीने पोहोचले.

बचावकार्यासाठी बचाव पथक पुण्याहून एनडीआरएफची २ पथके (६० जवान) पहाटे ४ वाजेपूर्वी घटनास्थळी पोहोचली. त्यांच्यासोबत श्वान पथक सुद्धा आहे. पनवेल येथील ट्रेकर्स ग्रुप यशवंती ट्रेकर्स व निसर्ग ग्रुपचे नियमित ट्रेक करणारे व त्या परिसरातील भैागोलिक परिस्थितीचा अनुभव असणारे तरुण बचाव पथकात सहभागी झाले आहेत. हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर पहाटेपासून सांताक्रुझ हवाईतळावर बचावासाठी तयार आहेत. तथापि, खराब हवामानामुळे उड्डाण घेऊ शकत नाहीत. घटनास्थळावरून ज्या काही सूचना येत आहेत त्यावर मुंबईतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार समन्वय करत आहेत.

केंद्राकडून मदतीचे आश्वासन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही दूरध्वनीवरून संपूर्ण घटनेची माहिती घेतली आणि केंद्र शासनाकडून जी काही मदत लागेल ती देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयातील दालनात अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. दुर्घटनास्थळी अत्यावश्यक अन्नधान्य व रॉकेल पुरवठा करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

१०० टक्के गावाचे मॅपिंग

नाना पटोले यांनी गाडगीळ समितीच्या अहवालाचे काय झाले, याची विचारणा विधानसभेत केली. त्यावर गाडगीळ समितीने २०१२-१३ मध्ये अहवाल दिला. गावांचे मॅपिंग करायचे होते. मी मुख्यमंत्री असताना १०० टक्के गावाचे मॅपिंग केले. प्रत्येक गावाचा कोअर झोन, बफर झोन मॅपिंग केला. हा अहवाल केंद्राकडे पाठविला, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

२८ कुटुंबांतील नागरिक दरडीखाली!

इर्शाळवाडीत एकूण ४८ कुटुंबं राहत होती. तेथील लोकसंख्या २२८ आहे. त्यापैकी २५ ते २८ कुटुंबं बाधित झालेली आहेत. २२८ पैकी ७० नागरिक स्वत: घटनेच्या वेळीच सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती आहे व २१ जखमी असून, त्यापैकी १७ लोकांवर तात्पुरत्या बेसकॅम्पमध्ये उपचार केले असून, ६ लोकांना पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार दिले जात आहेत. उर्वरित लोकांचा शोध व बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफच्या देखरेखीखाली स्थानिक गिर्यारोहक तरुण, एनडीआरफ जवान व सिडकोने पाठविलेले मजूर यांच्यामार्फत कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

मुख्यमंत्री ऑन द स्पॉट

विधानभवनातले कामकाज संपवून बुधवारी सायंकाळी नियंत्रण कक्षातून राज्यातल्या मुसळधार पावसाचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला होता. मुख्यमंत्री शिंदे हे सकाळी सहा वाजताच मुंबईहून निघाले. घटनास्थळी ते साडेसात वाजता पोहोचले. आधी बेसकॅम्पमधून तर नंतर थेट दुर्गम अशा घटनास्थळी जाऊन त्यांनी बचावकार्यात स्वत:ला झोकून दिले. भरपावसात विश्रांती न घेता, रेनकोट घालून स्वत: बचावकार्यात उतरलेले मुख्यमंत्री पाहून बरोबरचे अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा अवाक‌् झाले. चिखलाने निसरडा झालेला रस्ता पायी तुडवत ते वस्तीवर पोहचले. मी मुख्यमंत्री असलो तरी स्वत:ला सामान्य कार्यकर्ताच समजतो, असे नेहमी मुख्यमंत्री भाषणांमधून सांगत असतात. त्याचा प्रत्यय आज सर्वांना आला. अपघात असो.. आपत्ती येवो.. वैद्यकीय मदत असो, सामान्यांच्या मदतीसाठी सदैव ‘ऑन फिल्ड’ असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सामान्यांसाठी असणारी तळमळ आज पुन्हा एकदा दिसून आली.

प्रतिकूल परिस्थितीमुळे पुरेशी यंत्रणा डोंगरावर मदतकार्यासाठी जाऊ शकत नव्हती हे पाहून सकाळी साडेसातपासून ‘ऑन फिल्ड’ असलेल्या मुख्यमंत्र्यांमधील कार्यकर्ता अस्वस्थ होता. डोंगरावर जाऊन प्रत्यक्ष मदत केली पाहिजे, नागरिकांना बाहेर काढले पाहिजे, असे ते सोबतच्या मंत्र्यांना देखील सांगत होते. इर्शाळगडाच्या पायथ्याला असलेल्या गावाला बेसकॅम्प करून मुख्यमंत्री केवळ निर्देश, सूचना देऊन तेथून निघाले नाहीत, तर त्यांनी परिसरातील औद्योगिक वसाहतींमधील कामगारांना मदतीचे आवाहन केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. दुपारी एकच्या सुमारास भरपावसात मुख्यमंत्री इर्शाळगडावर पायी चालत निघाले. पायथा ते दुर्घटनास्थळ हे सुमारे दीड तासाचे अंतर त्यांनी चालत जाऊन गाठायचे ठरवले.

अजितदादा कंट्रोल रूममध्ये

मुख्यमंत्री शिंदे ऑन द स्पॉट होते, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळीच मंत्रालयात जाऊन आपत्कालीन नियंत्रण कक्षाची सूत्रे स्वीकारत, बचाव व मदतकार्यावर देखरेख ठेवली. उपमुख्यमंत्री अजित पवार नियंत्रण कक्षातून दुर्घटनास्थळावर उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना बचाव, मदतकार्यासाठी हेलिकॉप्टरसह आदी यंत्रणा तात्काळ उपलब्ध करून देण्याची कार्यवाही पूर्ण केली. दुर्घटनास्थळी उपस्थित मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून त्यांनाही नियंत्रण कक्षास प्राप्त झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

जे.जे., केईएम हॉस्पिटलमध्ये मदत

इर्शाळवाडीची दुर्घटना माळीणसारखीच आहे. अनेक लोक दबले गेले आहेत. लोकांना जे.जे., केईएम हॉस्पिटलमध्ये मदत केली जाईल. तिथे मोठे रुग्णालय बांधण्यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण विभाग नाही, तर आरोग्य खात्याकडून बांधण्यासंदर्भात सूचना करू, असे वैद्यकीय, शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.

विरोधी पक्ष सरकारसोबत आहे!

अशा घटना घडतात तेव्हा सत्ताधारी, विरोधक असे काही नसते. घटनास्थळी विरोधी पक्षाच्या प्रमुखाला देखील सोबत घेऊन जाण्याची प्रथा आहे. विरोधी पक्षाला एक परंपरा म्हणून बोलावले असते तर योग्य ठरले असते. आपल्याला एकत्रच काम करायचे आहे. यात राजकारण कोणालाही करायचे नाही. विरोधी पक्ष जरी असलो तरी सरकारसोबतच आहोत.

बाळासाहेब थोरात, काँग्रेस विधिमंडळ नेते

सरकारने काळजी घ्यावी

जी गावे डोंगरावर किंवा पायथ्याशी आहेत त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. राज्यात इतर ठिकाणी अशा घटना घडू नयेत याची सरकारने काळजी घ्यावी.

अशोक चव्हाण, कॉँग्रेस नेते

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in