पोलीस ठाण्यातच थरार, भाजप आमदाराचा शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर गोळीबार; झाली अटक

कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शुक्रवारी रात्री उशीरा शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरमध्ये पोलीस ठाण्यातच गोळीबार केला.
पोलीस ठाण्यातच थरार, भाजप आमदाराचा शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर गोळीबार; झाली अटक

कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शुक्रवारी रात्री उशीरा शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरमध्ये पोलीस ठाण्यातच गोळीबार केला. गणपत गायकवाड यांनी हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये महेश गायकवाड आणि त्यांच्यासोबत असलेल्या राहुल पाटील यांच्यावर ४ ते ५ गोळ्या झाडल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर गणपत गायकवाड यांनी आपल्या कृत्याची कबुलीही दिली. या प्रकरणी पोलिसांनी आमदार गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे.

जमिनीचा वाद आणि आपसांतील वैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे. हिल लाईन पोलीस स्टेशनअंतर्गत द्वार्ली गावातील जमिनीच्या ताब्यावरून हा राडा झाला. आमदार गायकवाड यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या केबिनमध्येच गोळीबार केल्याचं समजतंय. रात्री १०.३० ते ११ च्या सुमारास हा प्रकार घडला.

"महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यात काही गोष्टीवरून मतभेद होते आणि ते तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यात बोलणे झाले आणि गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्या लोकांवर गोळीबार केला. यामध्ये 2 जण जखमी झाले असून तपास सुरू आहे, असे सुधाकर पठारे, डीसीपी, ठाणे यांनी सांगितले.

ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात महेश गायकवाड यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. हिल लाइन पोलिसांनी गोळीबार आणि हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत गणपत गायकवाड, हर्षल केणे आणि संदीप सर्वांकर या तिघांना अटक केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in