कल्याणमधून श्रीकांत शिंदे! नाशिकवरून महायुतीत रस्सीखेच

महायुतीतील जागावाटपाचा तिढा जवळपास सुटण्याच्या स्थितीत असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये कल्याणची जागा शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे यांनाच सोडण्यात आली. मात्र, ठाण्यावर भाजपचा दावा कायम आहे.
कल्याणमधून श्रीकांत शिंदे! नाशिकवरून महायुतीत रस्सीखेच
Published on

विशेष प्रतिनिधी/मुंबई

महायुतीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून भाजप व शिवसेनेत निर्माण झालेल्या संघर्षावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी अधिकृतपणे पडदा टाकला. श्रीकांत शिंदेंची उमेदवारी त्यांनी जाहीर केली असून त्यानंतर स्थानिक भाजपमधील कुरबुरी वाढली आहे. आता सातारा व सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ भाजपकडे जाणार आहेत.

महायुतीतील जागावाटपाचा तिढा जवळपास सुटण्याच्या स्थितीत असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये कल्याणची जागा शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे यांनाच सोडण्यात आली. मात्र, ठाण्यावर भाजपचा दावा कायम आहे. तसेच शिंदे गटही या जागेसाठी आग्रही आहे. त्यामुळे ठाणे, पालघर आणि छत्रपती संभाजीनगर या जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळू शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे, तर भाजपकडे रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि सातारा राहू शकतो, असेही सांगितले जात आहे. मात्र, नाशिकवरून महायुतीत चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. या जागेवर भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादीचाही दावा आहे. त्यामुळे या जागेवरून अजूनही चर्चा सुरू असल्याचे समजते.

महायुतीत बऱ्याच जागांचा तिढा सुटणे बाकी होते. त्यामध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या जागांवरूनच रस्सीखेच अधिक होती. राष्ट्रवादीला ४ ते ५ जागा देण्यावरच भाजप ठाम असल्याने राष्ट्रवादीचा कोटा जवळपास संपल्यात जमा आहे. साताऱ्याच्या बदल्यात मिळाली तर एखादेवेळी नाशिक मिळू शकते. परंतु शिवसेना शिंदे गट ही जागा सोडायला तयार नाही. त्यातच भाजपही या जागेवर आग्रही आहे. त्यामुळे नाशिकचा तिढा अद्याप सुटलेला नाही. परंतु इतर जागांचा गुंता जवळपास सुटत आल्याचे बोलले जात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कल्याण लोकसभा मतदारसंघाचा तिढा सोडवण्यात आला असून, पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली.

तसेच ठाण्याबाबतही शिंदे सेनेचा आग्रह आहे. त्यामुळे ठाणेही त्यांना सुटू शकते. परंतु योग्य उमेदवाराचा शोध सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी काही नावे सुचविलेली आहेत. परंतु ती भाजपला मान्य नाहीत. परंतु आमदार प्रताप सरनाईक यांच्या नावावर एकमत आहे. तथापि, सरनाईक यांना लोकसभा निवडणूक लढवायची नाही, असे समजते. त्यामुळे दुसऱ्या उमेदवाराचा शोध घेतला जात आहे.

शिवसेना ठाकरे गटाकडे ठाण्यात सक्षम उमेदवार नसल्याने आता आयात उमेदवारावर ही लढत होऊ शकते. त्यामुळे आता संजीव नाईक यांना शिंदे गटाच्या शिवसेनेत घेऊन मैदानात उतरवावे, असा प्रस्ताव भाजपने शिवसेनेकडे ठेवला आहे. परंतु ठाणे हा शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे आपलाच उमेदवार मैदानात उतरवावा, अशी त्यांची इच्छा आहे. परंतु सक्षम उमेदवार नसल्यास नाईक यांच्या पर्यायावरच विचार केला जाऊ शकतो. याशिवाय पालघर लोकसभा मतदारसंघही शिवसेनेलाच मिळू शकतो. त्यामुळे कल्याणमधून श्रीकांत शिंदे, पालघरमधून राजेंद्र गावित लढू शकतात. याशिवाय, उत्तर-पश्चिम मुंबईची जागाही शिंदेंकडे जाणार असून छ. संभाजीनगरही शिवसेनेलाच सुटण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास सांदिपान भुमरे मैदानात उतरू शकतात.

सातारा, सिंधुदुर्गमध्ये भाजप

यासोबतच सातारा आणि सिंधुदुर्ग-रत्नागिरी हे मतदारसंघ भाजपला मिळण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे साताऱ्यातून भाजपचे उदयनराजे भोसले जवळपास फायनल उमेदवार असू शकतात, तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनाच उमेदवारी मिळू शकते. यामुळे या मतदारसंघात शिंदे गटाचे उदय सामंत आणि इच्छुक उमेदवार किरण सामंत नाराज होऊ शकतात. याचा फटका भाजपला बसू शकतो.

मोठ्या फरकाने जिंकणार; श्रीकांत शिंदे यांना विश्वास

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी जाहीर केल्याबद्दलच्या निर्णयाचे आपण स्वागत करतो, असे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, आपण मोठ्या फरकाने विजयी होऊ. काही लोक व त्यांचे समर्थक आपल्या उमेदवारीला व्यक्तिगत पातळीवर विरोध करीत असून त्यांनी तो अंमलात आणावा.’

logo
marathi.freepressjournal.in