
डोंबिवली : कल्याणमधील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या आरोपाखाली विशाल गवळी व त्याची पत्नी साक्षी या दोघांना पोलिसांनी अटक केली. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात या गुन्ह्याचा खटला भरविण्यात आला असून साक्षीच्या वकिलाने सुनावणीपूर्वीच वकीलपत्र मागे घेतले. या गुन्ह्यातील तपास पुढील टप्प्यात असून मोबाईल डेटा, सीडीआर (कॉल डेटा रेकॉर्ड) आणि अन्य पुरावे तपासून या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी विशाल गवळीने आपला मोबाईल शेगाव येथे लॉजमालकाला विकल्याची माहिती समोर आली आहे. त्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह ज्या बॅगेत भरून बापगावात टाकण्यात आला होता, ती बॅग अद्याप पोलिसांना सापडली नाही. आरोपी विशाल गवळीने ती बॅग कुठेतरी लपवून ठेवली असल्याचा संशय पोलिसांना आहे. आरोपींच्या मोबाईलमध्ये अत्यंत संवेदनशील माहिती असल्याचा पोलिसांचा दावा आहे. मोबाईलमधील डेटा तपासण्यासाठी पोलिसांनी पुन्हा ३ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयाने ती नाकारली आणि दोघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठवले. आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळीला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
विशाल गवळीने आपला मोबाईल शेगाव येथे लॉजमालकाला विकल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित लॉजमालकाने पोलिसांशी संपर्क साधला असून मोबाईल लवकरच पोलिसांच्या ताब्यात येणार आहे. आरोपी विशाल गवळीचे वकील यांनी धमकी मिळाल्याचा दावा केला आहे. त्यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
साक्षी गवळीला मिळणार सरकारी वकील
साक्षीच्या वकिलाने सुनावणीपूर्वीच वकीलपत्र मागे घेतले. त्यामुळे आरोपी साक्षीने न्यायालयात वकील देण्याची विनंती केली असून न्यायालयाने तिला सरकारी वकील देण्याचा निर्णय घेतला आहे.