

पुणे : देशातील शिक्षण आणि परीक्षा व्यवस्थेत निर्माण झालेला गोंधळ, वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटना आणि त्यातून विद्यार्थ्यांचे होत असलेले नुकसान यामुळे देशाचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले असून, या गंभीर प्रश्नावर केंद्र सरकार मौन बाळगून असल्याची टीका काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी केली.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सुरू केलेल्या ‘छात्रों की गूंज’ या देशव्यापी मोहिमेअंतर्गत गुरुवारी पुण्यासह देशातील २८ प्रमुख शहरांमध्ये पत्रकार परिषदांचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत कन्हैया कुमार बोलत होते.
शिक्षण क्षेत्रातील वाढत्या खासगीकरणावरही त्यांनी चिंता व्यक्त केली. भारतीय पालक आपल्या मुलांच्या शिक्षणावर मोठ्या प्रमाणात खर्च करत असून, शिक्षण व्यवस्था जाणीवपूर्वक कमकुवत केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आयआयटी, एम्स आणि यूपीएससीसारख्या प्रतिष्ठित संस्थांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला. देशात विविध परीक्षांचे ८० हून अधिक वेळा पेपर फुटल्याचा आरोप करत, प्रत्यक्ष आकडा यापेक्षाही मोठा असू शकतो, असे ते म्हणाले.
नुकत्याच झालेल्या री-नीट परीक्षेतही कथित ‘सॉल्वर गँग’ पकडल्या गेल्याचा उल्लेख करत, सरकारला निष्पक्ष परीक्षा घेणेही शक्य होत नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पुण्यातूनच पेपरफुटी प्रकरणातील पहिला आरोपी पकडला गेल्याचा उल्लेख करत त्यांनी तपासाच्या पद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले. आरक्षण हा संविधानाने दिलेला अधिकार असून तो कोणावरही उपकार नसल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षण हा श्रीमंतांचा विशेषाधिकार नसून प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारची केवळ ‘परीक्षा पे चर्चा’
नीट पेपरफुटी प्रकरणामुळे आतापर्यंत २१ विद्यार्थ्यांचा बळी गेल्याचा दावा केला जात असून, देशात दर तासाला दोन तरुण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. मात्र, केंद्र सरकार केवळ ‘परीक्षा पे चर्चा’ करण्यापुरते मर्यादित राहिले असून पंतप्रधान या गंभीर विषयावर मौन बाळगून आहेत, असा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आवाहन करताना त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी स्वतःला एकटे समजू नये किंवा पेपरफुटीसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींच्या चुकीची शिक्षा स्वतःला देऊ नये. ‘तुम्ही हरलेले नाही, तर ही भ्रष्ट व्यवस्था हरली आहे,’ असे ते म्हणाले.