कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडसाठी निवडलेली जागा राज्य सरकारची असल्याची माहिती आज विधान परिषदेत सरकारने दिली आहे. ही जागा केंद्र सरकारची असल्याचा संभ्रम अखेर दूर झाला आहे. आरे वाचवा मोहिमेतील कार्यकर्त्यांनी, पर्यावरणवाद्यांनी या जागेत आरे मेट्रो कारशेड बनवण्यात यावं, अशी मागणी केली होती. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आरेतील कारशेडला स्थगिती देऊन कांजूर येथील जागेवर कारशेड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयावर भाजपने जोरदार टीका केली होती.
ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत कांजूरमार्ग येथील जागेबाबत तारांकित प्रश्न विचारला असता राज्य सरकारकडून या प्रश्नाला लेखी उत्तर देण्यात आलं आहे. या उत्तरात ही जागा राज्य सरकारची असल्याची कबूली सरकारने दिली आहे. या जागेवर केंद्र सरकारने तसंच एका खासगी व्यक्तीने दावा केला होता. हे प्रकरण हाय कोर्टापर्यंत गेले होतं. यात हायकोर्टाने खासगी व्यक्तीने केलेला दावा खोडून काढला होता.
कांजूरमार्गची जागा राज्य सरकारची असल्याची लेखी कबूली दिल्यानंतर ठाकरे गटाचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. कांजूरमार्गच्या जागेवर मेट्रो कारशेड केल्याने, वेळ, पैसा वाचला असता आणि आज कारशेड पूर्ण झालं असतं. मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे उभारलं असत तर चार मेट्रो लाईन एकत्र आल्या असत्या, असं आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी विरोधकांनी मेट्रोबाबत राजकारण का केलं, असा सवाल करत विरोधकांनी राजकारण केलं नसतं तर आज आरे वाचलं असतं, असं ते म्हणाले.