कनवाळू कर्मयोगी नेता

महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक कणखर नेतृत्व म्हणून ओळखले जातात.
कनवाळू कर्मयोगी नेता

महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक कणखर नेतृत्व म्हणून ओळखले जातात. एक आक्रमक तितकेच ते कनवाळू आहेत. विं. दा. करंदीकर यांच्या कवितेतील देणाऱ्याचे हात शिंदे यांचे आहेत. या कणखर नेतृत्वाच्या जवळ गेल्यानंतर ते किती हळवे आहेत, याची प्रचिती येते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्याकडे पाहून ते कठोर असतील, असे वाटते; परंतु तसे ते नाहीत. लहान-सहान प्रसंगातून त्यांचे आभाळाएवढे मोठेपण दिसून येते. त्यांच्या कार्यालयात आणि निवासस्थानी लोकांची वर्दळ असते. ते जिथे जातील, तिथे माणसांचे मोहोळ तयार होते. समाजाची तळमळ असणारे राजकीय नेते, रंजल्या-गांजलेल्यांचे प्रश्न मांडणारे जागरूक लोकप्रतिनिधी, आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा वापर करून अडचणीत सापडलेल्या शेतकरी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावणारे मुख्यमंत्री, कलाकारांना प्रोत्साहन देणारे रसिक आणि घरातील प्रत्येकाची काळजी घेणारे कुटुंबप्रमुख अशी त्यांची अनेक रूपे वेगवेगळ्या लोकांना दिसली आहेत. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण ही बाळासाहेबांची शिकवण त्यांनी प्रत्यक्षात आणली आहे. शिंदे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण देशात अल्पावधीत एक आदर्श मुख्यमंत्री म्हणून नावलौकिक मिळविला आहे. अन्याय करणार नाही आणि अन्याय सहन करणार नाही, ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण शिंदे यांनी प्रत्यक्षात आणली आहे. कणखर, संयमी व सर्वसमावेशक नेतृत्व असल्याने शिंदे यांनी चालविलेला कारभार भल्याभल्या राजकारण्यांना अचंबित करणारा ठरला. या सरकारने जनतेला दिलेला दिलासा, अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना विक्रमी वेळेत दिलेली मदत यामुळे काही महिन्यांतच शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले. मराठा आरक्षणाचा प्रश्न ते ज्या पद्धतीने हाताळत आहेत, त्यावरून त्यांचा कामातील कणखरपणा दिसतो. शेतकऱ्यांना मदत करण्यास सदैव तयार निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या वर्षी बळीराजा पुरता अडचणीत आला होता. अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि दररोज पिकांवर येणाऱ्या निरनिराळ्या रोगांमुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला होता. अशा शेतकऱ्यांना स्वातंत्र्यानंतर किंवा राज्याच्या निर्मितीनंतर इतक्या विक्रमी वेळेत मदत जाहीर होण्याची कदाचित ही पहिलीच वेळ होती. एवढेच नव्हे, तर प्रत्येक वेळी सर्वसामान्य शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी त्यांनी भरीव मदत दिली. त्यांना प्रेरक नेते, शेतकरी पुत्र, अनाथांचे नाथ, कष्टकऱ्यांचे प्रतिनिधी, बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार अशी अनेक विशेषणे त्यांना शोभून दिसतात. महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेतील शिंदे हे असे एकमेव मुख्यमंत्री आहेत, जे सुरक्षा आणि शिष्टाचार न बाळगता सर्वसामान्यांना भेटतात, त्यांच्याशी संवाद साधतात. राज्यातील प्रत्येकाला ते आपले मुख्यमंत्री वाटतात. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे त्यांना परिस्थितीची पुरेपूर जाणीव आहे. विशेषत: सामान्य नागरिकांबद्दल आणि त्यांच्या कामांबद्दल ते स्वतः लक्ष घालून तळमळीने सगळी कामे करून घेतात.

शिंदे यांनी अनैसर्गिक असलेल्या महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय हा सर्वस्वी क्रांतिकारी होता. मुळामध्ये शिवसेना आणि भाजपची युती ही नैसर्गिक युती होती; मात्र शिवसेना पक्षाने महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याचा घेतलेला निर्णय हा चुकीचा आणि महाराष्ट्राच्या जनतेवर चुकीच्या पद्धतीने लादलेला होता. शिंदे यांनी राज्यातील जनतेच्या मतांचा विचार करीत अनैसर्गिक युतीतून बाहेर पडत पुन्हा एकदा नैसर्गिक युतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यामुळे आज लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे की, हे आपले सरकार आहे. विरोधकांना विकासातून उत्तर देण्याची आणि प्रसंगी मोजक्याच शब्दांत विरोधकांना नामोहरम करण्याची त्यांची शैली भलतीच लोकप्रिय झाली आहे. उद्योग खात्यावर त्यांचे यांचे विशेष लक्ष आहे. उद्योग खात्याच्या माध्यमातून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत असून या माध्यमातून स्थानिकांना आणि तरुणांच्या हाताला रोजगार मिळत आहे. दावोस परिषदेतील आणलेली गुंतवणूक असो, की दर महिन्याला एक एमआयडीसी मंजूर करण्याचा धडाका पाहिला, तर त्यांना राज्य कुठे न्यायचे आहे, हे स्पष्ट होते. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने दावोस येथे जानेवारी महिन्यात ‘वर्ल्ड इकाॅनॉमिक फोरम’ आयोजित जागतिक अर्थ परिषदेत विविध उद्योगांसमवेत सुमारे तीन लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे झालेले करार पाहिले, तर काही काळातच महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरची होईल, यात कोणतीही शंका नाही. प्रथमच दावोस इथे महाराष्ट्राचे इतक्या मोठ्या संख्येने करार झाल्यामुळे देशी आणि विदेशी गुंतवणूकदारांचा राज्यावर विश्वास वाढला आहे. करार करूनच ते थांबत नाहीत, तर गुंतवणूकदारांचे प्रकल्प लवकरात लवकर सुरू होतील, याकडे त्यांचे लक्ष असते. या गुंतवणुकीच्या माध्यमातून सुमारे दोन लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे. ‘मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम योजना,’ विशेष प्रवर्ग/घटकांमध्ये अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/महिला/अपंग/माजी सैनिक या घटकांना आतापर्यंत लाभ देण्यात येत होता; परंतु शिंदे यांनी त्यात आणखी तीन घटकांचा समावेश केला आहे. या तीन घटकांमध्ये इतर मागास प्रवर्ग/विमुक्त व भटक्या जमाती/अल्पसंख्याक यांचा समावेश करण्यात आला आहे. योजनेमध्ये या नवीन घटकांचा समावेश झाल्यामुळे लाभार्थींची संख्या वाढणार असून, या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे.

आज संपूर्ण राज्याला शिंदे यांची ओळख ही ‘विकासपुरूष’ म्हणून झालेली आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारे ‘व्हिजन’ त्यांच्याकडे असून विदर्भ, मराठवाडा, कोकण, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील प्रत्येक भागाच्या विकासाकडे त्यांचे वैयक्तिक लक्ष आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम अत्यंत कमी वेळेमध्ये पूर्ण होण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान राहिलेले आहे. हा महामार्ग केवळ काही शहरांना जोडणारा महामार्ग नाही, तर या माध्यमातून राज्याच्या आणि देशाच्याही आर्थिक विकासाला हातभार लागणार आहे. या महाकाय प्रकल्पाच्या भूसंपादनाचे कठीण काम त्यांनी अवघ्या १८महिन्यांच्या वेळेमध्ये पूर्ण केले. विशेषतः शेतकऱ्यांनी आनंदाने या प्रकल्पासाठी आपल्या जमिनी दिल्या. त्यांनी पहिल्या दिवसापासून लोकहिताच्या कामांना प्राधान्यक्रम देत कामाचा धडाका लावलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ते सर्वसामान्य नागरिकांसाठी २४ बाय ७ व ३६५दिवस अव्याहतपणे कार्यरत आहे. शिंदे हे गेली चार दशके सार्वजनिक जीवनात कार्यरत आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत इतर सर्व नेत्यांपेक्षा वेगळी आहे. त्यांना वेळेचे, काळाचे असे काहीही बंधन नाही. दिवसभर शासकीय कामकाज आणि मध्यरात्री कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम ते करीत असतात. पहाटे ही त्यांचे काम सुरू असते.’सर्वसामान्य नागरिकांचे भले झाले पाहिजे’ हा एकच विचार घेऊन ते सदैव कार्यशील असतात. भारताला पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनवण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी महाराष्ट्रावर मोठी जबाबदारी येऊन पडते आणि ही जबाबदारी शिंदे अत्यंत चांगल्याप्रकारे पार पाडत आहेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना जिद्द, मेहनत, स्व:कर्तृत्व याच्या जोरावर त्यांनी आपले स्थान निर्माण व मजबूत केले त्यांचा प्रवास हा थक्क करायला लावणारा आहेच; शिवाय शिंदे यांच्या आयुष्याचा आणि राजकीय वाटचालीचा प्रवास प्रत्येकासाठी, विशेषतः तरुणांसाठी प्रेरणादायी आणि अनुकरणीय आहे.

logo
marathi.freepressjournal.in