तीन दिग्गज केंद्रीय मंत्री पराभूत, महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका

जालना लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार रावसाहेब दानवे, दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप उमेदवार डॉ. भारती पवार आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील पराभूत झाले आहेत.
तीन दिग्गज केंद्रीय मंत्री पराभूत, महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका
ANI

मुंबई : महाराष्ट्रात या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला असून, तीन दिग्गज केंद्रीय मंत्री पराभूत झाले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत भाजपला चीतपट केले आहे. जालना लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार रावसाहेब दानवे, दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप उमेदवार डॉ. भारती पवार आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील पराभूत झाले आहेत.

भिवंडी लोकसभा मतदारसंघातून मतमोजणीच्या २४ व्या फेरीत केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांना ३ लाख ६३ हजार ८०९ मते मिळाली, तर बाळ्या मामा सुरेश म्हात्रे यांना ४ लाख ४७ हजार १७८ मते मिळाली आहेत, तर अपक्ष उमेदवार म्हणून निलेश सांबरे यांना १ लाख ९७ हजार ८५४ मते मिळाली आहेत. एकूणच बाळ्या मामा सुरेश म्हात्रे हे ८३०००च्या फरकाने विजयी झाले आहेत. विद्यमान खासदार आणि केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याविषयी लोकसभा मतदारसंघात मतदारांमध्ये नाराजी दिसून येत होती. त्या नाराजीचा फटका त्यांना बसला आहे.

जालन्यात रावसाहेब दानवे हरले

जालना लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार रावसाहेब दानवे यांना महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांनी मोठा धक्का दिला आहे. जालना येथे कॉँग्रेस उमेदवार कल्याण काळे यांचा ६५ हजार मतांच्या फरकाने विजय झाला आहे. गेल्या २० वर्षांपासून दानवे हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. यावेळी कल्याणराव यांच्या रूपात त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिलेले होते. त्यातच मराठा आंदोलक जरांगे-पाटील यांच्या भूमिकेमुळे देखील जालन्यात राजकारणावर प्रभाव पडला. सुरुवातीला या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचे पारडे जड मानले जात होते. पण ही जागा जिंकण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी पूर्ण ताकद पणाला लावली होती. याचा फायदा महाविकास आघाडीला झाला आहे.

दिंडोरीत भास्कर भगरे विजयी

शरद पवार गटाने दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का दिला असून, येथे केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप उमेदवार भारती पवार पिछाडीवर पडल्या असून, येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांनी मोठी आघाडी घेतली आहे. या मतदारसंघात भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांना चार लाख चौसष्ठ हजार १४० मते मिळाली. राष्ट्रवादीच्या भास्कर भगरे यांना पाच लाख ७७ हजार ३३९ मते मिळाली. भगरे हे १ लाख १३ हजार १९९ मतांनी आघाडीवर होते.

सुधीर मुनगंटीवार पराभूत

चंद्रपूर : चंद्रपूर-वणी-आर्णी मतदार संघातून काँग्रेस उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांनी २ लाख ६० हजार ४१० इतक्या विक्रमी मताधिक्याने विजय मिळविला. त्यांनी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव केला. धानोरकर यांना ७ लाख १८ हजार ४१० मते मिळाली, तर मुनगंटीवार यांना ४ लाख ५८ हजार ४ मते मिळाली. इतर सर्व १३ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. धानोरकर या विदर्भात सर्वाधिक मतांनी विजयी झाल्या आहेत.

लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांतील सर्व सहाही विधानसभा मतदारसंघात धानोरकर यांना आघाडी मिळाली. या लोकसभा मतदारसंघात चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि आर्णी विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.

logo
marathi.freepressjournal.in