
कराड : हिंदी सिनेसृष्टीतील “महानायक अमिताभ बच्चन” यांच्या ८३व्या वाढदिवसानिमित्त कराड शहरात ‘अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप’तर्फे एक विक्रमी आणि अविस्मरणीय संगीत महोत्सव पार पडला. शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजता सुरू झालेला हा सोहळा शनिवारी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सलग २४ तास चालला.
संगीत महोत्सवात कराडसह सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील १२५ हून अधिक कलाकारांनी सहभाग घेतला आणि अडीचशेहून अधिक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील गाणी सादर केली. पंकज हॉटेलच्या हॉलमध्ये आयोजित या सोहळ्याला हजारो रसिक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात केक कापून आणि ‘अग्निपथ, अग्निपथ’ या प्रेरणादायी कवितेने झाली. ग्रुपच्या थीम सॉंग ‘एक दुसरे से करते हैं प्यार हम’ने उत्सवाला भावनिक रंग भरला.
मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत ३५ गायकांनी गाणी सादर केली, तर सकाळी सहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत ‘साथिया संगीतप्रेमी ग्रुप’, ‘रागमंजिरी’, ‘स्वरसाज’ आणि ‘रॉयल कराओके सिंगिंग ग्रुप’ यांनी बच्चन गाणी सादर केल्या. दुपारी केक कापून वाढदिवस साजरा झाला आणि प्रायोजकांचा सत्कार करण्यात आला. सायंकाळी ‘कंपा अकॅडमी’, ‘किशोर कुमार फॅन क्लब’ आणि ‘स्वरसंस्कार संगीत अकॅडमी’च्या कलाकारांनी गाण्यांची मालिका सादर केली. रात्री अकरानंतर दिवसभरातील टॉप सहा गायकांनी गायनाने कार्यक्रमाची उंची आणली, तर मध्यरात्री पुन्हा वाढदिवस साजरा करून महोत्सवाची सांगता झाली.
समांतर उपक्रमात कला शिक्षक सतीश उपळावीकर यांनी अमिताभ बच्चन यांच्या जीवनावर आधारित ८३ फूट उंच कॅनव्हास पेंटिंग २४ तास अखंड रेखाटन केले, जे देशात पहिल्यांदाच करण्यात आले. या भव्य कार्यक्रमात शहरातील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय मान्यवरांनी उपस्थित राहून अभिवादन केले. माजी खासदार श्रीनिवास पाटील आणि माजी आमदार बाळासाहेब पाटील यांनी कलाकारांचे कौतुक केले. कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष समीर जोशी आणि माजी नगरसेवक सौरभ पाटील यांनीही शुभेच्छा दिल्या.
रसिकांसाठी अविस्मरणीय महोत्सव
‘मुकद्दर का सिकंदर अभिमान पत्र’ देऊन सहभागी कलाकार व गायक-गायिकांचा गौरव करण्यात आला. सभागृहामध्ये अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांच्या दृश्यांनी सजावट करण्यात आली होती. गाणी, संवाद आणि चित्रपटगोष्टींनी भरलेला हा महोत्सव रसिकांसाठी अविस्मरणीय ठरला. ‘अमिताभ बच्चनप्रेमी ग्रुप’, कराड, गेल्या दहा वर्षांपासून दरवर्षी वाढदिवस निमित्त वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. यंदाचा विक्रमी २४ तासांचा सोहळा ग्रुपच्या संस्थापक अध्यक्ष सतीश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला.