

कराड : सह्याद्री पर्वतरांगांच्या घनदाट कुशीत वसलेले चांदोली राष्ट्रीय अभयारण्य सध्या एका वेगळ्याच निसर्गसौंदर्याने उजळून निघाले आहे. पावसाळ्याच्या उंबरठ्यावर या परिसरात रात्रीच्या वेळी हजारो काजव्यांची मोहक रोषणाई पाहायला मिळत असून, हा अद्भुत निसर्गानुभव पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालत आहे.
विशेषतः चांदोली धरण परिसरात अंधार पडताच झाडांवर लाखो काजवे लुकलुकताना दिसत आहेत. जणू निसर्गानेच धरण परिसरात प्रकाशाच्या दिव्यांची माळ सजवली आहे, असा भास पर्यटकांना होत आहे. त्यामुळे या दिवसांत चांदोली परिसरात निसर्गप्रेमी आणि पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. चांदोली परिसरात गेली अनेक वर्षे काजव्यांचा अभ्यास करणाऱ्या निसर्ग अभ्यासकांनी या चमचमत्या दुनियेबाबत अत्यंत रंजक माहिती दिली आहे. त्यांच्या मते, काजवे हे प्रामुख्याने भुंग्यांच्या कुळातील कीटक आहेत. जगभरात काजव्यांच्या सुमारे दोन हजार प्रजाती आढळतात; मात्र भारतात केवळ नऊ ते दहा प्रजातींची नोंद झाली आहे.
मे महिन्याचा शेवट आणि जूनच्या सुरुवातीला पडणाऱ्या पावसाच्या पहिल्या सरींनंतर काजव्यांच्या जीवनचक्राला नवे रूप प्राप्त होते. पावसाळ्याच्या दिवसांत मादी काजवा झाडांच्या खोडांमध्ये, पाणथळ जागांजवळ किंवा उंच गवताळ भागातील पालापाचोळ्यात साधारण १०० अंडी घालते.
निसर्गातील एक विलक्षण चमत्कार म्हणजे काजव्यांची केवळ प्रौढ अवस्था नव्हे, तर त्यांची अंडी आणि अळीदेखील अंधारात चमकण्याची क्षमता बाळगतात. साधारण दोन आठवड्यांत अंड्यांतून अळ्या बाहेर पडतात. या अळ्या शेतीला हानिकारक ठरणारे कीटक, लहान-मोठे किडे आणि गोगलगायींचे भक्षण करतात. त्यामुळे काजवे हे शेतकऱ्यांचे मित्र मानले जातात.