Karad News : व्यावसायिक दांडिया-गरब्यामुळे पारंपरिक उत्सवाचे पावित्र्य कलंकित; सकल हिंदू समाज आक्रमक; आयोजनावर बंदीची मागणी

नवरात्रोत्सव अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला असताना कराड शहरातील व्यावसायिक दांडिया-गरबा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सकल हिंदू समाजाने या कार्यक्रमांना तीव्र विरोध दर्शवून प्रशासनाकडे बंदीची मागणी केली आहे.
Karad News : व्यावसायिक दांडिया-गरब्यामुळे पारंपरिक उत्सवाचे पावित्र्य कलंकित; सकल हिंदू समाज आक्रमक; आयोजनावर बंदीची मागणी
Published on

कराड : नवरात्रोत्सव अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला असताना कराड शहरातील व्यावसायिक दांडिया-गरबा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सकल हिंदू समाजाने या कार्यक्रमांना तीव्र विरोध दर्शवून प्रशासनाकडे बंदीची मागणी केली आहे. अशा कार्यक्रमांमुळे हिंदू संस्कृतीचे विकृतीकरण होते, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो आणि उत्सवाचे पावित्र्य कलंकित होते, असा आरोप समाजाच्या निवेदनात करण्यात आला आहे.

सोमवारी सकल हिंदू समाजाच्या प्रतिनिधींनी कराड पोलीस प्रशासनाला यासंदर्भातील निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, नवरात्रोत्सव हा माता दुर्गेच्या भक्तिभावाने साजरा होणारा पारंपरिक उत्सव आहे. मात्र, शहर व परिसरातील काही हॉटेल्स, लॉन्स आणि इव्हेंट कंपन्या व्यावसायिक फायद्यासाठी तथाकथित “डिस्को गरबा” आयोजित करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे चुकीच्या प्रवृत्तींना खतपाणी मिळते, महिलांचा सन्मान धोक्यात येतो आणि हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जातात.

कराड शहर व परिसरात व्यावसायिक दांडिया-गरबा कार्यक्रमांना परवानगी देऊ नये. आयोजन झाल्यास आयोजकांवर कठोर कारवाई करावी. उत्सव काळात महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पोलीस दक्षता घ्यावी. असे कार्यक्रम संबंधित समाजापुरते मर्यादित ठेवावेत; अन्य धर्मीयांना प्रवेश नाकारावा. हॉटेल, लॉन व कॅफे मालकांनी आपली ठिकाणे व्यावसायिक दांडिया-गरबासाठी उपलब्ध करून देऊ नयेत. स्पीकर परवाने नियमानुसार द्यावेत आणि दसऱ्यानंतर दोन दिवस विसर्जनासाठी मुभा द्यावी, अशा मागण्या केल्या आहेत.

गणेशोत्सवाच्या वेळी जशा सुरक्षा व नियंत्रण उपाययोजना राबवल्या जातात, त्याच पद्धतीने नवरात्रोत्सवातही प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली. निवेदनावर विविध समाजबांधव व संस्थांची नावे आहेत.

एकूणच, यावर्षीचा नवरात्रोत्सव सुरू होण्याआधीच कराडमधील व्यावसायिक दांडिया-गरबा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत, हे स्पष्ट झाले आहे.

उत्सवाला व्यावसायिक रंग चढल्याने तीव्र विरोध

कराडमध्ये रास दांडिया-गरबा हा प्रामुख्याने राजस्थानी, गुजराती, सिंधी, पश्चिम बंगाली समाजाचा परंपरागत सण मानला जातो. परंतु, या उत्सवाला व्यावसायिक रंग चढल्याने स्थानिकांकडून तीव्र विरोध होत आहे. आता हे समाजबांधव व आयोजक कोणती भूमिका घेतात आणि प्रशासन हे प्रकरण कशा प्रकारे हाताळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
marathi.freepressjournal.in