कराड : दुष्काळाचा पक्षी पर्यटनालाही फटका; देशी-विदेशी पक्ष्यांची तलावांकडे पाठ, पाणीसाठा खालावला

गेल्या पावसाळ्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर बनली आहे.
कराड : दुष्काळाचा पक्षी पर्यटनालाही फटका; देशी-विदेशी पक्ष्यांची तलावांकडे पाठ, पाणीसाठा खालावला
कराड : दुष्काळाचा पक्षी पर्यटनालाही फटका; देशी-विदेशी पक्ष्यांची तलावांकडे पाठ, पाणीसाठा खालावला'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

कराड : गेल्या पावसाळ्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर बनली आहे. पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असतानाच या दुष्काळाचा परिणाम आता पक्षी पर्यटनावरही होण्याची चिन्हे दिसत आहेत. खटाव तालुक्यातील येरळवाडी, सूर्याचीवाडी, कानकात्रे आणि मायणी येथील तलावांमध्ये पाणीसाठा कमी झाल्याने दरवर्षी हिवाळ्यात दाखल होणाऱ्या देशी आणि परदेशी पक्ष्यांच्या आगमनावर परिणाम झाला आहे. विशेषतः विदेशी फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्ष्यांच्या आगमनाची पक्षीप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत.

दुष्काळी खटाव आणि माण तालुक्यातील येरळवाडी, मायणी, कानकात्रे, सूर्याचीवाडी तसेच माण तालुक्यातील देवापूर तलावावर दरवर्षी नोव्हेंबर ते डिसेंबरदरम्यान हजारो किलोमीटरचा प्रवास करून देशी आणि परदेशी पक्षी दाखल होतात. हे पक्षी फेब्रुवारी-मार्चपर्यंत या तलावांवर मुक्काम करतात. तलावांमधील उथळ पाण्यात मुबलक खाद्य उपलब्ध होत असल्याने हे ठिकाण पक्ष्यांसाठी अनुकूल मानले जाते.

स्थानिक पक्ष्यांची वर्दळ कायम

परदेशी पक्ष्यांचे आगमन अद्याप अपेक्षित नसले, तरी या भागातील तलावांवर स्थानिक पक्ष्यांची वर्दळ सुरू आहे. सध्या स्पूनबिल, ग्रे हेरॉन, कांडेसर, चित्रबलाक, कवड्या खंड्या, चांदवा, पांढरापरीट, पाणकावळा, पाणबुडी, पाणपाकोळी, शराटी आणि शेकाट्या आदी पक्षी दिसत आहेत. मात्र, तलावांमधील पाणीसाठा कमी झाल्यास पक्ष्यांच्या अधिवासावर आणि त्यांच्या खाद्यसाखळीवरही परिणाम होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)