कराड : पाटण तालुक्यातील कोयना विभागातील तळीये (पश्चिम) येथील अल्पवयीन मुलीचा क्रूरपणे खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी ज्ञानदेव तुकाराम सुतार (३७) याला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेऊन कोयनानगर पोलिसांच्या हाती दिले. पाटण न्यायालयात त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ऑगस्ट २०२४ मध्ये आरोपी ज्ञानदेव सुतारने पीडित मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार कोयनानगर पोलिसांकडे दाखल करण्यात आली होती. तपासादरम्यान ठाणे पोलिसांना माहिती मिळाली की, आरोपीने वाजेगाव परिसरात गरोदर अल्पवयीन मुलीला गळा दाबून खून करून कोयना नदीजवळ खड्ड्यात पुरले. ठाणे पोलीस उपनिरीक्षक खेडकर व डीबी पथकाने संशयिताचा शोध घेत आरोपीला ठाणे रेल्वे स्थानकाजवळून ताब्यात घेतले. त्यानंतर कोयनानगर पोलिसांच्या हद्दीत आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. तपासात आरोपीने अल्पवयीन मुलीला गळा दाबून खून केल्याची कबुली दिली.
पोलीस कोठडी घेऊन आरोपीने सांगितलेल्या ठिकाणी पाटणचे नायब तहसीलदार पंडीत पाटील, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत मृतदेह उत्खनन करून ताब्यात घेतला. मृतदेहाचे कायदेशीर सोपस्कार करून नातेवाईकांच्या ताब्यात दिले गेले. सदर प्रकरणाचा पुढील तपास कोयनानगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. के. ओलेकर करत आहेत. या प्रकरणामुळे पाटण तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांनी आरोपीच्या कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.