कराड नगरपालिका काँग्रेस स्वबळावर लढणार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती

सर्व बैठका व चर्चेनंतर कराड नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी दुपारी पत्रकारांशी बोलताना दिली.
पृथ्वीराज चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण (संग्रहित छायाचित्र)
Published on

कराड : कराडसह शेजारच्या मलकापूर नगरपरिषदेची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्यासाठी काही जागांबाबत तडजोड करण्याचे प्रयत्न माजी मंत्री सतेज पाटील यांच्या माध्यमातून झाले होते. मात्र मी स्वतः या कोणत्याही प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग नव्हता, त्यामुळे सर्व बैठका व चर्चेनंतर कराड नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी दुपारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

कराड नगरपरिषद निवडणुकीबाबत चर्चा सुरू असताना महाविकास आघाडीतील काही पक्षांच्या मागणीप्रमाणे आघाडी करून लढावे, असा सूर निघाला होता. मात्र ते शक्य नसल्याने काँग्रेसने कराड नगरपरिषदेत नगराध्यक्षपदासह अनेक नगरसेवकपदांचे उमेदवार काँग्रेसच्या चिन्हावर दिले आहेत. तर मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत समविचारी उमेदवारांना मदत करून निवडणूक लढवण्यात येईल, असे स्पष्ट करत चव्हाण म्हणाले की, काँग्रेसने अंतिम निर्णय घेतल्याने निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवली जाईल आणि नगराध्यक्षपदही काँग्रेसचाच निश्चित विजय होईल.

काँग्रेसच्या चिन्हावर लढणाऱ्या उमेदवारांसह शिवसेना ठाकरे गटानेही एक उमेदवार दिला असून त्यांचाही प्रचार करण्यात येणार आहे. मी स्वतः प्रत्यक्ष गल्लीबोळात प्रचारात नसलो तरी उमेदवारांनी विनंती केल्यास मी नक्कीच सभा घेऊन प्रचार करेन, असे चव्हाण म्हणाले. मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारांना मदत करण्यास तसेच त्यांच्या प्रचारात काँग्रेसचा सहभाग राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मनोहर शिंदेंना शुभेच्छा

कराड दक्षिण काँग्रेसचे माजी अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी मलकापूर निवडणुकीच्या निमित्ताने भाजपमध्ये प्रवेश केल्याबाबत विचारले असता चव्हाण म्हणाले, मनोहर शिंदे यांनी या निर्णयाबाबत माझ्याशी चर्चा केली असती तर मी त्यांना निश्चित आशीर्वाद दिला असता. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे मला समजले, मात्र त्यांनी माझ्याशी वैयक्तिक बोलणे गरजेचे होते, तरीही त्यांनी घेतलेल्या निर्णयासाठी माझ्या शुभेच्छा आहेत.

स्टार प्रचारक सहभागी होणार

कराड नगरपरिषदेची निवडणूक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार स्वबळावर व काँग्रेसच्या चिन्हावर लढविण्यात येणार असून यासाठी काँग्रेसकडून स्टार प्रचारक येणार असल्याची माहिती कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ॲड. अमित जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कराड नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या वतीने भरण्यात आलेले नगराध्यक्ष व नगरसेवकपदांचे अर्ज वैध ठरले आहेत. या निवडणुकीत स्थानिक विकासाच्या मुद्यांवर प्रचार करून निवडणूक लढवणार असल्याचे सांगून ॲड. जाधव म्हणाले की, या निवडणुकीच्या प्रचाराकरिता कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज, माजी मंत्री सतेज पाटील, विश्वजीत कदम, चंद्रकांत हंडोरे आदी मान्यवर येणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in