दोन दुचाकींच्या धडकेत डॉक्टर ठार
कराड : दोन दुचाकींच्या धडकेत डॉक्टर ठार तर युवक गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना येथील कराड-पाटण मार्गावरील मुंढे गावच्या हद्दीत बुधवारी घडली. डॉ. निवास दत्तू वीर (६३) असे ठार झालेल्या डॉक्टरांचे नाव आहे तर गंभीर जखमी झालेल्या मुजम्मिल फरीन सय्यद (२५) याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तुळसण येथील डॉ. निवास वीर हे कुटुंबीयांसह विमानतळ येथे वास्तव्यास होते. त्याठिकाणीच त्यांचे क्लिनिक असून बुधवारी दुचाकीवरून मुंढे गावात गेले होते. तेथून ते परत घराकडे येत असताना कराड-पाटण महामार्ग ओलांडताना पाटणहून आलेल्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यामध्ये डॉ. निवास वीर व दुसऱ्या दुचाकीवरील मुजम्मिल सय्यद हा युवक गंभीर जखमी झाला. अपघात निदर्शनास येताच परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेऊन दोन्ही जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले.