

कराड : नीट परीक्षा पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा, या मागणीसाठी देशभर सुरू असलेल्या आंदोलनाला कराडमध्येही प्रतिसाद मिळाला. पंचायत समिती सदस्य संग्राम पवार यांच्या नेतृत्वाखाली शहरात एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत नीट परीक्षा प्रक्रियेत झालेल्या कथित गैरव्यवहाराचा तीव्र निषेध व्यक्त केला.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या पेपरफुटीसारख्या गंभीर प्रकारामुळे लाखो विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले असून, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, नीटसारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेची विश्वासार्हता अबाधित ठेवणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. मात्र, वारंवार घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे.
सर्वपक्षीयांचा पाठिंबा
आंदोलनाला विविध राष्ट्रीय तसेच प्रादेशिक पक्षांनी आणि वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनालाही पाठिंबा दिल्याचे आंदोलकांनी सांगितले. धरणे आंदोलनात सचिन पाटील, प्रताप भनगे, अभिजीत चवरे, दिग्विजय थोरात, संतोष पवार, स्वप्नील गायकवाड, देवदास माने, सुरेश पाटील, शरद गाडे, विद्याधर गायकवाड, इंद्रजीत पाटील, धीरज जाधव, अमोल जाधव, अक्षय सुर्वे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलन शांततेत पार पडले.
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जोरदार पाठिंबा; शेकाप, रासप, बळीराजा शेतकरी संघटनेकडून रास्ता रोको
कराड : ज्येष्ठ संशोधक व पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत शेतकरी कामगार पक्ष (शेकाप), राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) आणि बळीराजा शेतकरी संघटना यांच्या वतीने कराड येथील कोल्हापूर नाका परिसरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर रास्ता रोको आंदोलन व निदर्शने करण्यात आली. आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची दखल घेण्याची मागणी केली. आंदोलनकर्त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांच्या हिताचे प्रश्न आणि स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली. शेकापचे जिल्हाध्यक्ष भाई अॅड. समीर देसाई यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सोनम वांगचुक हे देशाच्या भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी संघर्ष करत आहेत. मात्र, केंद्र सरकार त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सरकारचे धोरण उद्योगपतींच्या हिताचे असल्याचा आरोप करत त्यांनी शेतमालाला हमीभाव, वाढत्या इंधनदरांचा प्रश्न आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा याकडेही लक्ष वेधले. सोनम वांगचुक हे कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हे, तर देशातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल व्हावा, यासाठी आंदोलन करत आहेत, असे ते म्हणाले. आंदोलनात प्रल्हाद माने, संदीप तिकवडे, भाई हैबतराव पवार, आनंदराव (चेअरमन) थोरात, हुबाळे साहेब, जगताप यांच्यासह शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष आणि बळीराजा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी काही काळ रास्ता रोको करत वाहतूक रोखली आणि केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या हिताचे प्रश्न तातडीने सोडवावेत, अशी मागणी केली.