

कराड : खरेदी केलेल्या जमिनीच्या दस्ताची सात बारावर नोंद प्रमाणित करून ती नोंदवण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पुसेगाव (ता. खटाव) येथील मंडलाधिकाऱ्यास साताऱ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले. किशोर नंदू खटावकर असे अटक करण्यात आलेल्या मंडल अधिकाऱ्याचे नाव असून त्याच्याविरुद्ध सोमवारी रात्री पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पुसेगावच्या महसूल विभागात एकच खळबळ उडाली.
तक्रारदाराने ११ ऑगस्ट रोजी मौजे धावडधरे येथील गट क्रमांक १९१ मधील ०.४२ आर क्षेत्रांची जमीन रजिस्टर खरेदीखताद्वारे खरेदी केली होती.या खरेदीखताची नोंद करण्यासाठी त्यांनी १९ ऑगस्ट रोजी कटगुण येथील तलाठ्याकडे अर्ज केला.त्यानुसार तलाठ्याने २ सप्टेंबर रोजी नोंद घेतली.तक्रारदार नोंद प्रमाणित करून घेण्यासाठी मंडलाधिकारी किशोर खटावकर यांना भेटले असता,त्यांनी खरेदीखताची नोंद प्रमाणित करून देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
याबाबत तक्रारदाराने सोम. ५ सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.पडताळणा दरम्यान खटावकर यांनी तक्रारदाराकडे तीन हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर पथकाने सोमवारी सायंकाळी सापळा रचून लाचेची रक्कम स्वीकारताना खटावकर यांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्याच्याविरुद्ध रात्री उशिरा पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.