

कराड : दिवाळी सणाचा उत्साह शिगेला पोहोचला असताना ग्रामीण भागात कडकलक्ष्मीच्या आगमनाने दिवाळी पहाटेची सुरुवात होत आहे. ढोलक्यावर फायबरच्या काठीने ठेका धरत काढला जाणारा ‘बुगू... बुगू...’ आवाज, पारंपरिक लोकगीते आणि देवीच्या दर्शनासाठी होणारी गर्दी यामुळे गावोगावी दिवाळीचे वातावरण अधिकच भक्तिमय होत आहे. काळ बदलला, विज्ञानाची प्रगती झाली, तरी ग्रामीण भागात कडकलक्ष्मीवरील श्रद्धा आजही कायम असल्याचे चित्र दिसत आहे.
केवळ उदरनिर्वाहासाठी दिवाळीच्या आधीच शहरांसह ग्रामीण भागात दाखल होणाऱ्या कडकलक्ष्मीच्या जोगव्याला सणाच्या पहाटेपासून सुरुवात होते. अभ्यंगस्नान करून सज्ज झाल्यानंतर डोक्यावर देवीचा देव्हारा घेऊन ही मंडळी गल्लीबोळांत फिरतात. ढोलक्याच्या तालावर ‘बुगू... बुगू...’ असा आवाज करत घराघरांत जोगवा मागितला जातो. त्यांच्या पारंपरिक लोकगीतांमधून संसारातील सुख-दुःख, कौटुंबिक नातेसंबंध आणि सामाजिक जाणिवांचे दर्शन घडते.
‘लेकीचा नवस घे की गं, लेकीच्या वट्या भराया, वर्षात एकदाच येतेस आई... लेकराबाळांना सुख देऊन जा आई...’ अशा भावपूर्ण कवनांतून देवीकडे सुख-समृद्धीची प्रार्थना केली जाते. त्याचबरोबर लोकभाषेतील बोधवचनांतून समाजप्रबोधनही केले जाते. जुन्या परंपरा, कौटुंबिक मूल्ये आणि माणुसकीचा संदेश या गीतांमधून दिला जातो.
गल्लीत पोहोचल्यानंतर डोक्यावरील देव्हारा खाली उतरवून कडकलक्ष्मीचा वेश धारण केलेली व्यक्ती चेहऱ्यावर मुखवटा लावते. त्यानंतर ढोलक्याच्या तालावर नृत्य करत आणि स्वतःच्या अंगावर चाबकाचे (पोत) फटके मारत उपस्थितांचे लक्ष वेधून घेते. या वेळी लहान मुलांचे मनोरंजनही केले जाते.
कडकलक्ष्मीच्या आगमनानंतर गावातील महिला सुपामध्ये खण-नारळाची ओटी आणि दिवाळीच्या फराळाचे पदार्थ घेऊन देवीची ओटी भरतात. देवीचे पूजन करून घरातील सुख-समृद्धी आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी प्रार्थना करतात.
परंपरेतून मनोरंजन अन् प्रबोधन
या परंपरेत मनोरंजनाबरोबरच श्रद्धा आणि प्रबोधनाचा संगम पाहायला मिळतो. लोकगीतांतून समाजाला संदेश देणे, मुखवट्याद्वारे बालगोपाळांचे मनोरंजन करणे आणि पारंपरिक पद्धतीने जोगवा मागणे, असा कडकलक्ष्मीचा दिनक्रम असतो. आधुनिकतेच्या काळातही ग्रामीण भागाने ही परंपरा जपली आहे. कडकलक्ष्मीच्या ‘बुगू... बुगू...’ आवाजाने गावकऱ्यांची दिवाळी पहाट आजही उजाडत आहे. अंगावर चाबकाचे फटके झेलत, मुखवटा धारण करून लहान मुलांचे मनोरंजन करणे आणि पारंपरिक लोकगीतांतून समाजप्रबोधन करणे, ही कडकलक्ष्मीची परंपरा आजही ग्रामीण भागात टिकून आहे.