

कराड : कौटुंबिक वादातून मुलाच्या डोक्यात स्टूल घालून खून केल्याप्रकरणी आई, वडील आणि भावाला कराड ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. धनाजी ऊर्फ धनंजय सत्यवान अदलिंगे (३२) असे मृताचे नाव आहे. न्यायालयाने तिन्ही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गोळेश्वर येथे आठवडाभरापूर्वी धनाजीचा आई-वडील आणि भावासोबत कौटुंबिक कारणावरून वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर झालेल्या मारहाणीत त्याच्या डोक्यात स्टूल घातल्याने मृत्यू झाला. त्यानंतर पुरावा लपविण्यासाठी मृतदेह पोत्यात कोंबून शेणोली स्टेशन ते सोनसळदरम्यानच्या सोनसळ घाटातील खोल दरीत फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.
चार दिवसांपूर्वी घाटात उग्र वास येत असल्याने वन कर्मचाऱ्याला माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस पाटलामार्फत कराड ग्रामीण पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता पोत्यात मृतदेह आढळला. तपासात मृताची ओळख पटली आणि कौटुंबिक वादाचा धागा समोर आला.
सत्यवान तुकाराम अदलिंगे, सुरेखा सत्यवान अदलिंगे आणि लक्ष्मण सत्यवान अदलिंगे अशी आरोपींची नावे आहेत. चौकशीनंतर शुक्रवारी रात्री त्यांना अटक करण्यात आली. शनिवारी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.