

कराड : २०२४च्या विधानसभेच्या निवडणुकीत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये दुबार, तिबार तसेच संशयास्पद ५६ हजार नोंदी आढळून आल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया (एसआयआर) सुरू असताना मतदार याद्यांची निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने तपासणी करून संशयास्पद नावे वगळावीत, अशी मागणी त्यांनी केली.
चव्हाण यांनी मतदार याद्यांमधील घोळ, एसआयआर प्रक्रिया आणि २०२४च्या विधानसभा निवडणुकीतील प्रशासकीय कारभारावर जोरदार टीका केली. मतदार नोंदणीतील अनियमिततेबाबत २८ ऑगस्ट, ९ सप्टेंबर आणि १६ सप्टेंबर २०२४ रोजी प्रशासनाला पत्राद्वारे माहिती दिली होती. मात्र, त्यावेळी प्रभावी कारवाई झाली नसल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. ऑनलाइन पद्धतीने मतदार नोंदणी होत असल्याने त्याबाबत तक्रार घेता येत नाही किंवा नोंदी कमी करण्याचा अधिकार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. कराड दक्षिणच्या मतदार यादीत कराड उत्तरमधील ६,०६३, वाळवा-इस्लामपूरमधील ६,४१२, शिराळ्यातील ७,९७६, पाटणमधील ४,१०० आणि पलूस-कडेगावमधील ३,९६२ नावे असल्याचे त्यांनी सांगितले.
दुबार मतदार नोंदी अस्तित्वात असल्यास संबंधित व्यक्तींना वेगवेगळ्या ठिकाणी मतदानाची संधी मिळू शकते. त्यामुळे मतदार याद्यांची सखोल तपासणी होणे आवश्यक आहे, असे चव्हाण म्हणाले. आम्ही दिलेल्या ५६ हजार नोंदींपैकी काही नावे समान असलेल्या वेगवेगळ्या व्यक्तींची असू शकतात. मात्र, या माहितीच्या आधारे दुबार, तिबार किंवा बोगस नावे शोधण्यास प्रशासनाला मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह
एसआयआर प्रक्रिया निष्पक्षपणे राबवून दुबार व संशयास्पद नावे तातडीने वगळण्यात यावीत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच मतदार याद्यांमधील या नोंदींचा २०२४च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर परिणाम झाल्याचा दावा करत त्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरात उपस्थित केलेल्या ‘व्होट चोरी’च्या मुद्द्याचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला.