प्रतिनिधी : विजय मांडे
कर्जत : कर्जत तालुक्यातील नांगुर्ले अभयवाडीमध्ये राहणाऱ्या चव्हाण कुटुंबाची शेती कर्जत, खालापूर या दोन्ही तालुक्याच्या हद्दीत आहे. तर चव्हाण यांच्या शेतीला लागून ओरलँडर (सॉल्ट) रिसॉर्ट असून या रिसॉर्टमध्ये तलाव बांधण्यात आलेला आहे. या तलावाच्या बांधकामामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह रोखला जाऊन त्याचे पाणी चव्हाण यांच्या भातशेतीमध्ये शिरले आहे. तक्रारी, उपोषणे करून देखील अद्याप न्याय मिळालेला नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले. तेव्हा याप्रकारामुळे चव्हाण कुटुंब चिंतीत झाले असून आता न्याय न मिळाल्यास तक्रारदार अलका चव्हाण समेळ यांनी देशाच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी जलसमाधी घेणार असल्याचे जाहीर केले आहे.
कर्जत तालुक्यातील नांगुर्ले अभयवाडी या भागात कोकणातील चव्हाण कुटुंब १९७७ साली वसले. या भागात त्यांनी शेतीसाठी जागा घेतली होती. हा भाग कर्जत व खालापूर असा दोन्ही तालुक्याच्या सीमेवर आहे. त्यामुळे चव्हाण यांची अधिक जागा ही खालापूर तालुक्यात येते. चव्हाण कुटुंबाची आज येथे दहा एकर जागा आहे. तर त्यातील पाच एकर जागेमध्ये ते लागवड करतात. दत्ताराम चव्हाण यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी सुलोचना चव्हाण यांनी शेतीची धुरा सांभाळली. खालापूर तालुक्यातील पाली बुद्रुक येथील सर्व्हे नंबर ९४, ९५ व ९९ अशी शेत मिळकत सुलोचना चव्हाण, अलका चव्हाण, किशोर चव्हाण, नरेश चव्हाण, सरिता चव्हाण, सायली गावकर यांच्या नावे आहे. शेतीशी चव्हाण कुटुंबाची नाळ जोडली गेल्याने गेली अनेक वर्षे संकटांवर मात करीत हे कुटुंब शेती सांभाळून आहेत.
या रिसॉर्टमध्ये आहुजा यांनी सन २०२१-२०२२ च्या दरम्यान काही बदल करत तलावाची निर्मिती केली. मात्र यासाठी त्यांनी नैसर्गिक पाण्याचे प्रवाह खंडित केले आणि याचा फटका चव्हाण यांना बसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नैसर्गिक पाणी प्रवाह थांबवत तलाव बांधला असून कालांतराने निचरा होणारे पाणी अडविले. त्याठिकाणी तलाव बंधारा बांधला असून तलावाच्या निचऱ्याचे पाणीही अडविल्याने तलाव काटोकाट भरल्यावर ते चव्हाण यांच्या शेतात जाऊन अडीच एकर शेतीचे नुकसान होत आहे.
पावसाळ्यात तलावाचे पाणी व त्यांच्या शेतातील पाणी समेळ - चव्हाण यांच्या शेतात जाऊन सुमारे अडीच एकर शेतीचे नुकसान झाले आहे.
अनधिकृतपणे बांधलेल्या संपूर्ण तलावाचे डेमोलेशन करण्यात आले नाही. तसेच आमचे तीन वर्षातील देण्यात आली नाही तर मी देशाच्या ७७ व्या स्वातंत्रदिनी आमच्या शेतात आहुजा कुटुंबाच्या कृपेने साचलेल्या पाण्यात जलसमाधी घेणार आहे. असे निवेदन चव्हाण यांनी प्रशासनाला ऑनलाईन आणि पोस्टाने दिले आहे. याबाबत खालापूर तहसीलदार अयुब तांबोळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली
अलका समेळ-चव्हाण यांनी याबाबत खालापूर तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांनी २८ डिसेंबर रोजी संबंधित यांची संयुक्त बैठक घेऊन शेतकऱ्यांची नुकसानभरपाई व केलेले अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश दिले होते, परंतु त्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने अलका समेळ-चव्हाण यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत उपोषणाचा इशारा दिला होता. तरीही प्रशासन ढिम्म असल्याने अलका चव्हाण व त्यांची ७७ वर्षांची आई सुलोचना चव्हाण यांनी ७ जून रोजी उपोषणाला सुरुवात केली. अखेरीस या उपोषणाची दखल घेऊन खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी येऊन तलावाची भिंत तोडण्याचे आदेश दिल्यावर हे अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात झाली. मात्र त्यानंतर त्यांनी तोडलेली भिंत पुन्हा बांधल्याने हाच प्रकार समोर आला आहे.
"जर १४ ऑगस्टपर्यंत आहुजा कुटुंबाविरोधात कायदेशीर कारवाई, अनधिकृतपणे बांधलेल्या संपूर्ण तलावाचे डेमोलेशन करण्यात आले नाही तसेच आमचे तीन वर्षांचे झालेले नुकसानभरपाई देण्यात आली नाही तर मी देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन करून आमच्या शेतात आहुजा कुटुंबाच्या कृपेने साचलेल्या पाण्यात जलसमाधी घेणार आहे. कारण देश स्वातंत्र्य झाला असला तरी आम्हाला स्वातंत्र्य असल्याचे जाणवत नाही. आमच्याच भूमीत आमच्यावर अन्याय होऊनही सरकार आम्हाला न्याय देऊ शकत नाही". - अलका समेळ-चव्हाण, पीडित शेतकरी