

विजय मांडे/कर्जत
कर्जत तालुक्यात विकासाच्या मोठमोठ्या घोषणा होत असल्या, तरी गावागावांतील रस्त्यांची दुरवस्था हे विकासाच्या दाव्यांची पोलखोल करत आहे. हेच वास्तव कोंदिवडे गावातील शाळकरी मुलींनी आपल्या ‘ग्राउंड रिपोर्ट’मधून दाखवून दिले. विशेष म्हणजे, या मुलींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिक आमदार महेंद्र थोरवे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने या समस्येची दखल घेतली. अखेर कोंदिवडे रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
कोंदिवडे परिसरातील रस्त्याची दुरवस्था ही काही दिवसांपुरती मर्यादित नव्हती. मोठमोठे खड्डे, त्यात साचलेले पाणी आणि खराब रस्त्यामुळे विद्यार्थी, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच वाहनचालकांना दररोज त्रास सहन करावा लागत होता. शाळेत जाणाऱ्या नेहा घारे, ज्योत्स्ना आणि मानसी पवार या विद्यार्थिनींनी मात्र या समस्येकडे केवळ तक्रार म्हणून न पाहता थेट पत्रकाराची भूमिका बजावली.
हातात छत्रीचा माईक आणि दप्तरातील मोबाईलचा कॅमेरा घेऊन या मुलींनी रस्त्यावर उतरून ‘ग्राउंड रिपोर्ट’ तयार केला. रस्त्यावरील खड्डे, त्यात साचलेले पाणी आणि नागरिकांना होत असलेला त्रास त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून मांडला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आणि अखेर प्रशासनाला त्याची दखल घ्यावी लागली.
या घटनेने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एखाद्या गावातील समस्या सोशल मीडियावर किंवा मोठ्या माध्यमांमध्ये आल्यानंतरच प्रशासन जागे होते का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. कोणतेही पत्रकारितेचे औपचारिक प्रशिक्षण नसताना आणि कोणत्याही मोठ्या साधनसामग्रीशिवाय या मुलींनी मोबाईलच्या माध्यमातून आपल्या गावाची समस्या प्रभावीपणे मांडली.
‘मुलींच्या हातातील माईक ठरला प्रभावी’
या मुलींच्या ‘ग्राउंड रिपोर्ट’नंतर रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले असून, ते अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शाळकरी मुलींच्या आवाजाचा परिणाम प्रशासनापर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. कोंदिवडेची ही घटना केवळ रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या नसून, तालुक्यातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणारी आहे. रस्ते, पाणी, वीज यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत अनेक गावांमध्ये अद्याप समस्या कायम आहेत.
विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह
एकीकडे विकासाच्या घोषणा, भूमिपूजन आणि श्रेयवाद सुरू असताना दुसरीकडे शाळकरी विद्यार्थ्यांना खड्ड्यांतून वाट काढत शाळेत जावे लागणे, ही बाब विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. कोंदिवडेच्या या शाळकरी मुलींनी दाखवून दिले आहे की, समस्या मांडण्यासाठी मोठ्या व्यासपीठाची गरज नसते; प्रामाणिकपणे वास्तव लोकांसमोर मांडले, तर त्याचा आवाज प्रशासनापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो.