टोरंट जलविद्युत प्रकल्पाविरोधात भाजप पदाधिकाऱ्याचा राजीनामा

कर्जत तालुक्यात प्रस्तावित टोरंट जलविद्युत प्रकल्पासाठी सायडोंगर परिसरात सुरू असलेल्या वृक्षतोडीला विरोध दर्शवत भाजपच्या आणखी एका पदाधिकाऱ्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
टोरंट जलविद्युत प्रकल्पाविरोधात भाजप पदाधिकाऱ्याचा राजीनामा
टोरंट जलविद्युत प्रकल्पाविरोधात भाजप पदाधिकाऱ्याचा राजीनामा
Published on: 

कर्जत : कर्जत तालुक्यात प्रस्तावित टोरंट जलविद्युत प्रकल्पासाठी सायडोंगर परिसरात सुरू असलेल्या वृक्षतोडीला विरोध दर्शवत भाजपच्या आणखी एका पदाधिकाऱ्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. नेरळ युवा मोर्चा मंडळाचे सरचिटणीस आणि कर्जत तालुका युवा मोर्चाचे माजी सरचिटणीस संदेश सुदाम कराळे यांनी पक्षातील सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या प्रकल्पाच्या विरोधात राजीनामा देणारे ते चौथे पदाधिकारी ठरले आहेत.

कराळे यांनी आपल्या राजीनामा पत्रात जंगलतोड, सह्याद्रीच्या पर्यावरणाचा ऱ्हास, निसर्गसंपत्तीचे नुकसान आणि स्थानिक जनतेच्या भावनांकडे होणारे दुर्लक्ष याबाबत चिंता व्यक्त केली आहे. सह्याद्री, जंगल आणि वनसंपदा जपणे ही सामूहिक जबाबदारी असून विकासाच्या नावाखाली पर्यावरण आणि स्थानिकांच्या हक्कांचा बळी दिला जात असेल, तर त्याविरोधात भूमिका घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

टोरंट ऊर्जा प्रकल्पाच्या मुद्द्यावर आपली वैचारिक भूमिका आणि पक्षाची भूमिका यांच्यात मतभेद निर्माण झाल्याने राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे कराळे यांनी स्पष्ट केले. हा निर्णय कोणत्याही वैयक्तिक स्वार्थातून घेतलेला नसून पर्यावरण संरक्षण, सह्याद्रीचे अस्तित्व आणि स्थानिक जनतेच्या हितासाठी घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. सह्याद्री आणि जंगल वाचविण्यासह स्थानिक जनतेचा आवाज बुलंद करण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)