करुणा मुंडे माझी पत्नी नाही! पोटगीच्या आदेशाला धनंजय मुंडे यांचे सत्र न्यायालयात आव्हान

राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करुणा मुंडे यांना पोटगी देण्याचे आदेश कौटुंबिक न्यायालयाने दिले होते.
धनंजय मुंडे, करुणा शर्मा (डावीकडून)
धनंजय मुंडे, करुणा शर्मा (डावीकडून)
Published on

उर्वी महाजनी/ मुंबई

राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करुणा मुंडे यांना पोटगी देण्याचे आदेश कौटुंबिक न्यायालयाने दिले होते. मात्र, या आदेशाला धनंजय मुंडे यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. करुणा मुंडे ही माझी पत्नी नाही, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडे यांनी अपिलात सांगितले की, करुणा मुंडे यांच्यासोबत माझे कधीही लग्न झालेले नाही. न्यायाधीशांनी आमच्या नात्याचा चुकीचा अर्थ घेतला आणि चुकीचे निष्कर्ष काढले.

वकील सायली सावंत यांच्या माध्यमातून दाखल केलेल्या याचिकेत मुंडे यांनी म्हटले आहे की, न्यायाधीशांनी विचार न करता अंतरिम पोटगी मंजूर केली.

मुंडे म्हणाले की, करुणा यांच्याशी माझी भेट राजकीय क्षेत्रात झाली. त्यांच्या संबंधातून दोन मुलांचा जन्म झाला. मी माझ्या नावाचा वापर त्यांच्या मुलांच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये होऊ दिला. मात्र, माझे करुणाशी कधीही लग्न झाले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

करुणाला राजश्री मुंडे यांच्याशी झालेल्या विवाहाची पूर्ण कल्पना होती. तरीही तिने माझ्याशी संबंध ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, मुंडे यांनी आरोप केला की, २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आणि मंत्री झाल्यानंतर तिचे वर्तन पूर्णपणे बदलले. ती आणि तिच्या कुटुंबाने वारंवार आणि अव्यवहारिक आर्थिक मागण्या केल्या.

करुणाने माझी पत्नी म्हणून स्वत:ला म्हणवून घेत "करुणा धनंजय मुंडे" नावाने अनेक सोशल मीडिया खात्यांची निर्मिती केली. मी कधीही करुणाला घरी सोबत ठेवले नाही. मी कायदेशीरपणे राजश्री मुंडे हिच्याशीच विवाह केला आहे, असे मुंडे यांनी आव्हान याचिकेत म्हटले आहे.

करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या दाव्यावर उत्तर देण्यासाठी वेळ मागितला आहे. तिने अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांना आश्वासन दिले की, ती पुढील सुनावणीपर्यंत पोटगी आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी करणार नाही. याप्रकरणी न्यायालयात २१ मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

४ फेब्रुवारी रोजी, वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने करुणा मुंडे यांना दर महिना १.२५ लाख रुपये आणि त्यांच्या मुलीसाठी देखभाल खर्च म्हणून ७५ हजार रुपये दरमहा देण्याचा आदेश धनंजय मुंडे यांना दिला होता.

logo
marathi.freepressjournal.in