नागपूर : विदर्भातील कापूस उत्पादकांच्या समस्येवर काम करणाऱ्या तसेच विनोबा भावे यांनी स्थापन केलेल्या ग्रामसेवा मंडळाचा ऐतिहासिक वारसा चालवणाऱ्या आणि अग्रणी सेंद्रीय शेतकरी करुणा फुटाणे यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. रक्तदाब वाढल्यामुळे वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात पती ज्येष्ठ कृषितज्ज्ञ व सर्वोदयी कार्यकर्ते वसंतराव फुटाणे, मुले विनय व चिन्मय, सुना व नातवंडे असा परिवार आहे. आचार्य विनोबा भावे यांचे अनुयायी, प्रसिद्ध परंधाम प्रकाशनचे प्रकाशक दिवंगत रणजीतभाई देसाई यांच्या त्या कन्या होत.
देशी शुद्ध बियाणे, सेंद्रीय शेतीच्या तत्त्वांचे पालन करत वर्धा आणि नागपूरला जोडणाऱ्या गोपुरी गावात बीजोत्पादन करत शेतकऱ्याला समकालीन संघर्षात करुणा फुटाणे यांनी साथ दिली. महिला सक्षमीकरण, कृषी उद्योजकता, गोशाळा, तेलबियांचे सेंद्रिय बीजोत्पादन आणि शाश्वत शेती करत शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.