
जागतिक निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रंगीबेरंगाच्या फुलांची मुक्त उधळण करणाऱ्या साताऱ्यातील कास पठारावर मोठ्या प्रमाणात निसर्गसंपदा आहे. तसेच विविध प्रकारचे प्राणी देखील असल्याने या ठिकाणी रात्रीच्यावेळी शिकारीचे प्रकार घडत असून यावर आता करडी नजर ठेवण्यासाठी कास पठार कार्यकारी समिती आणि वन विभागाच्यावतीने रात्रीच्यावेळी खडा पहारा दिला जात आहे.
कास पठार कार्यकारी समितीचे कर्मचारी व रोहोटचे वनपाल राजाराम काशीद, वनरक्षक सुनील शेलार, तुषार लगड, दत्तात्रय हेरलेकर यांच्याद्वारे कास पठार भागात रात्रगस्त सुरू आहे. नियमित गस्त सुरू असल्याने शिकारीला मोठ्या प्रमाणात आळा बसण्यास मदत होत आहे. रात्रग्रस्त करताना साताऱ्याहून कास पठाराकडे येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते.
जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावर जंगलसंपदा आहे. येथे विविध प्रकारच्या मौल्यवान औषधी वनस्पती, वृक्ष आढळतात. कास पठार परिसरात एकूण २५० पाणनवठे असून,साधारण जानेवारी महिन्यापासून कास पठार समितीचे कर्मचारी टँकरद्वारे पाणवठ्यांत नियमितपणे पाणी भरतात. त्यामुळे मुक्या वन्य जीवांची तहान भागवली जात आहे.
कास पठार परिसरात रानगवे, रानडुक्कर, भेकर, सांबर,ससा,मुंगूस आदी प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. कास पठार कार्यकारी समितीमध्ये आटाळी, कासाणी, पाटेघर, कुसुंबी, कास, एकीव ही गावे समाविष्ट आहेत. तसेच औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात आहेत. परिसरात विविध पशुपक्षी दिसतात.
भेकर, सांबर, रानडुक्कर, ससा, रानगवे, आदी प्राणी कास पठारावर नियमित दिसतात. कास पठार परिसर हा ऑक्सिजन पार्क आहे. गर्द वनराईने नटलेला खास परिसर आहे. कोतवाल, दयाळू, बुलबुल, रॉबिन असे अनेक पक्षी परिसरात आढळतात. पर्यटकांना पाणकोंबड्या देखील दिसतात.
'हे' शिलेदार करतायत कासचे रक्षण
दिवसरात्र गस्तीला वनपाल राजाराम काशीद, वनरक्षक सुनील शेलार, तुषार लगड, दत्तात्रय हेरलेकर, समितीचे कर्मचारी विजय बादापुरे, कोंडिबा गोरे, सुजित जांभळे, लक्ष्मण शिंदे, सोमनाथ बुढळे, बजरंग चिकणे, गणेश चिकणे, महेश कदम, चंदर कदम, आनंद किर्दत, विठ्ठल गोरे, संतोष काळे, सागर भोसले, धोंडीराम किर्दत, हरिबा जांभळे, संतोष कदम काम करत आहेत.
पठारावर वाहनांची तपासणी…
कास परिसरात वनविभाग व कास कार्यकारी समितीच्या कर्मचाऱ्यांची नियमित गस्त सुरू असल्याने शिकारीला मोठ्या प्रमाणात आळा बसण्यास मदत होत आहे. सातारहून कास पठाराकडे येणाऱ्या वाहनांची तपासणी करून वाहने सोडली जातात. वनहद्दीत विनापरवाना फिरती केल्यास कास कार्यकारी समितीमार्फत उपद्रव शुल्क वसूल केले जाते.