
आज पुणे पोटनिवडणुकीच्या (Kasaba ByElection) निकाल लागणार असून सध्या दोन्ही मतदारसंघामध्ये मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. भाजपचा (BJP) बालेकिल्ला मानला जाणारा कसबा (Kasaba) पेठ मतदारसंघाच्या मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीकडून उभे राहिलेले काँग्रेसचे (Congress) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे १५व्या फेरीनंतर आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे पहिल्या फेरीपासून रवींद्र धंगेकर यांना आघाडी मिळाली आहे. भाजपचे हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी भाजपने सर्व ताकद पणाला लावली होती. मात्र, कसबाच्या मतदारांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांना आपला कौल दिल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ फेऱ्यांचा निकाल समोर आला असून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना ५६,४९७ मते मिळाली आहेत. तर, भाजपचे ५०,४९० मते मिळालेली आहेत. त्यामुळे धंगेकर हे तब्बल ६ हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. अजूनही अंतिम निकाल यायचा बाकी असून काँग्रेच्या रवींद्र धंगेकर यांचा कसबा मतदारसंघातील विजय निश्चित मानला जात आहे. यावेळी रवींद्र धंगेकरांच्या कार्यकर्त्यांकडून विजयी जल्लोषाला सुरुवात करण्यात आली आहे.